Download App

अहमदनगरच्या नामांतराबरोबर जिल्हा विभाजन झाले पाहिजे – राम शिंदे

अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी विधानपरिषदेत केली होती. या मागणीवर अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आधी विभाजन करा व त्यानंतर नामांतर करा अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी आपली भूमिका आज प्रसार माध्यमांसमोर मांडली.

आमदार राम शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. त्यामुळे मी पालकमंत्री असताना जिल्ह्याचे विभाजन व्हावे हीच माझी भूमिका राहिली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची देखील भूमिका तिच आहे.

जिल्हा विभाजनाची चर्चा होत असतानाच जिल्ह्याचं नामांतरणाचा देखील प्रश्न उपस्थित झाला. जिल्ह्याचे विभाजन होताच जिल्ह्याचे नामांतरण देखील झालं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या दृष्टिकोनातून देखील विधिमंडळामध्ये चर्चा झाली. लोकांमध्ये देखील चर्चा झाली.

त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षात असताना देखील त्यांनी विभाजनाला पाठिंबा दिला होता. मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी याच बाजूचे आहेत की जिल्हा विभाजन झालं पाहिजे, असं राम शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us