राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक वेगवेगळे आरोप पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून समोरच्या पक्षावर आरोप केले जात आहेत, सोबतच नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही काही शिवसेना आमदार काँग्रेसमध्ये जाणार होते. ते आताच्या एकनाथ शिंदे यांच्याच गटातील होते. तेव्हा हे आमदार दिल्लीत जाऊन अहमद पटेल यांना भेटत होते, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. झी 24 तासच्या ‘Black & White’ या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत यांच्या याच दाव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चव्हाण यांना विचारण्यात आले की संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला होता. ते अहमद पटेल यांना भेटले होते. यात किती तथ्य आहे?
यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी ऊत्तर दिले की त्याच्याविषयी मला जी माहिती आहे ती मी इथे बोलू शकणार नाही. त्यावर मी काही बोलणार नाही. असं म्हणत चव्हाण यांनी या प्रश्नाचं उत्तर देणे टाळले.