मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही नुकतीच मुंबईत विधान सभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने (Shivsena) विधानसभेला जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला. याशिवाय जागा वाटपावरही महत्वाची चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी राज्यातील 110 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईमध्ये वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला काही आमदार, मंत्री आणि संघटनेतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. (Eknath Shinde’s Shiv Sena has started preparations to contest elections on 110 seats in the state.)
जवळपास चार तास चाललेल्या बैठकीत शिंदे यांनी या बैठकीत सरकारी योजना घरोघरी पोहचवा, पक्ष सदस्य नोंदवीवर भर द्या, शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा, अशा पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सूचना दिल्या. याशिवाय मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा; आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्या. जागा वाटपात मतदारसंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, अशा कानपिचक्या देत नेते आणि मंत्र्यांना इलेक्शन मोडवर आणले. सोबतच निवडणुकीची रणनीती कशी असावी, यावर चर्चाही झाल्याचे आणि विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी प्राधान्य असेल, असेही सांगण्यात आल्याचे समजत आहे.
दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील 100 पेक्षा जास्त मतदारसंघांसाठी विधानसभा निरीक्षकांचीही नेमणूक केली. त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले. या 100 पैकी मुंबईतील 17 जागांचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या सोबत आहेत. तर सहा आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी मुंबईत 17 जागा शिंदे गट लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीमध्ये सध्या तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत. यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश आहे. आगामी विधान सभा निवडणुकीत यातील शिवसेना 70 आणि राष्ट्रवादी 70 असे 140 जागा तर भाजप 140 आणि मित्रपक्षांसाठी आठ जागा सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. पण आता शिंदे यांनी 100 जागांवर तयारी सुरु केल्याने अजितदादांच्या वाट्याला 40 जागाच येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार हे निश्चित आहे.