पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांचा मुंबईत झालेला कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान माेदी यांच्या कार्यक्रमावर टीका केली.
आमदार राेहित पवार यांनी यासंदर्भात फेसबुक आणि ट्विटर पाेस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. सन 2016 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते झाले आहे. मात्र, सहा-सात वर्षानंतर या कामाचे पुढे काय झाले, याबाबत काहीही कळायला मार्ग नाही. त्यामुळे मुंबईतील कार्यक्रम पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील, अशा शेलक्या शब्दात राेहित पवार यांनी टीका केली.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान माेदीं यांच्या उपस्थितीत घेतलेला हा 40 हजार काेटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचा भव्यदिव्य कार्यक्रम त्यासाठीच होता, अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कालच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाले. या तिघांनीही मुंबईच्या विकासासाठी महापालिकेची सत्ता आपल्या हाती देण्याचे मुंबईकरांना आवाहन केले.
मुंबई महापालिकेचे निवडणूक येत्या काही महिन्यात हाेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फुटला अशी सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.