Download App

फडणवीसांचा खास माणूस मतदारसंघात सक्रीय, BJP आमदाराची टीका, म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला पुरून उरतो’

Fadnavis’ OSD entry in Arvi Assembly : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी आर्वी विधानसभा (Arvi Assembly) मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या भाजपचे दादाराव केचे (Dadarao Keche)आर्वीचे विद्यमान आमदार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) सुमीत वानखेडे (Sumeet Wankhede) यांचे आर्वी हे मूळ गाव असल्याने ते देखील या मतदारसंघात चांगलेच सक्रीय झाले. त्यांनी मतदारांच्या समस्या सोडविण्याचा सपाटा लावताच आ. केचे यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. परिणामी आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम. पंत) येथील जाहीर सभेत त्यांनी सुमित वानखेडे यांचे नाव न घेता चांगलीच आगपाखड केली. हिरवळीवर उड्या मारू नका, आधी मतदारसंघात झटा, अशी टीका त्यांनी केली.

तळेगावच्या सभेत बोलतांना केचे म्हणाले की, गाडीतून उतरतो आणि नमस्कार करतो, इतक्याने कोणी नेता होत नाही. जनतेच्या सोबत काम करावे लागते. जनतेसाठी झटावे लागते. आम्ही पहाटेपासून उठून या मतदारसंघात झटलो, तेव्हा मतदारांनी पती-पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. या मतदारसंघात आता भाजपाची हिरवळ आहे. या आयत्या हिरवळीवर उड्या मारू नका. २०२९ पर्यंत थांबा नंतर आम्हीच तुम्हाला मतदारांत घेऊन जाऊ, असा सल्ला आ. केचे म्हणाले.

ते म्हणाले की, इतकेच नाही तर कुणी चार दिवसाचे येतात आणि बाता करायला लागतात. निवडणुका आल्या की, अशी वादळ येतात आणि जातात, त्याला आम्ही पुरुन उरतो असा इशाराही त्यांनी दिला. याची ऑडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.

Natya Parishad : प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी; कोण होणार नवा अध्यक्ष?

खरंतर या मतदारसंघात आ. दादाराव केचे यांच्या माध्यमातून सर्वात प्रथम ‘कमळ’ फुललं. त्यांनी या मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणीही केली; परंतु मतदारसंघाने त्यांना सलग दोन टर्ममध्ये कधीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे राज्यात जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा दादाराव केचे यांना मंत्रीपदाची संधी असताना मतदारांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये आमदार म्हणून ते निवडून आले तेव्हा, मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची मतदारसंघात जोरदार चर्चा होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांचा पुन्हा ‘चान्स’ गेला. आता भाजपचे सरकार असूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नसल्याने मंत्रीपदाचे काही खरे नाही.

यामुळे मंत्रिपदाची इच्छापूर्ती न झाल्याने आ. केचे यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा आर्वीचे पुत्र सुमित वानखेडे यांनी या मतदारसंघात लक्ष घालून नागरिकांच्या समस्या ऐकून घेत कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. वानखेडे यांनी मागील दोन महिन्यांत आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्याकरिता ८५० कोटींची विविध विकासकामे मंजूर केली.

आमदार म्हणून जे काम केचे यांना करता आले नाही, ते आष्टी आणि कारंजा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे काम वानखेडे यांनी पंधरा दिवसांत मंजूर करून आणले. त्यामुळे केचे यांच्या चिंतेत भर पडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डावलले जाण्याची भीती आ केचे यांना सतावत असल्याने त्यांनी आता जाहीर सभेतही नाव न घेता वानखेडे यांच्यावर आगपाखड सुरू केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आ. दादाराव केचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात.

 

Tags

follow us