लातूर जिल्ह्यात झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवले ते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या नातवाने गत दहा वर्षांमध्ये भाजपला (BJP) जिल्हा परिषदेपासून महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेपर्यंत (Lok Sabha) सगळ्याच निवडणुकीत आघाडी मिळवून दिली. यंदाच्या मात्र लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये भाजपचा पराभव झाला आणि निलंगेकरांच्या भरारीला ब्रेक लागला. हा धक्का पचेपर्यंत निलंग्यामध्ये विधानसभेलाही दणका देत संभाजी पाटील निलंगेकर यांचे विमानच जमिनीवर आणण्याची व्यूहरचना काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशभुख यांनी आखली आहे. नेमकी काय आहे ही खेळी आणि ती यशस्वी होऊ शकते का? काय घडतयं निलंग विधानसभा मतदारसंघात? (Fight between Sambhaji Patil Nilangekar of BJP and Ashok Patil Nilangekar of Congress in Nilanga Assembly Constituency)
निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजी पाटील निलंगेकर यांनी बांधलेला. मतदारसंघातील 1952 पासूनच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर तीन अपवाद वगळता निलंगेकरांनी ‘निलंगेकरांनाच’ पसंती दिली आहे. 1952 मध्ये कै. शेषराव वाघमारे हे पहिले कॉंग्रेसचे आमदार निवडून आले. पण मतदारसंघात मराठा उमेदवाराशिवाय पर्याय नाही, हे ओळखून 1957 च्या निवडणुकीत वाघमारे यांनीच डॉ. शिवाजी पाटील निलंगेकर यांना कॉंग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून दिले. त्यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून कै. श्रीपतराव सोळुंके मैदानात होते. त्यात सोळुंके आमदार झाले.
त्यानंतर 1962 मध्ये शिवाजी पाटील निलंगेकर निवडून आले. तेव्हा पासून त्यांनी विधानसभेवरील पकड घट्ट केली. पण दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांचा ताबा विरोधी पक्षाकडे होता. अशात 1995 च्या निवडणुकीत शिवाजी पाटील निलंगेकरांच्या कामगिरीला कंटाळून मतदारांनी परिवर्तन केले. जनता दलाचे माणिक जाधव निवडून आले. 2004 मध्ये निलंगेकर कुटुंबात उभी फुट पडली. नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंडखोरी केली आणि ग्रामीण विकास आघाडी स्थापन केली. पहिल्याच फटक्यात पंचायत समितीवर विजय मिळवला. विलासराव देशमुख यांच्या समर्थकांच्या मदतीने आई रुपाताई निलंगेकर यांना भाजपकडून लोकसभेवर निवडून आणले.
पाठोपाठ विधानसभेला युतीत शिवसेनेकडे असलेला मतदार संघ भाजपाने घेतला. त्यात दिग्गज आजोबांचा पराभव करत संभाजी पाटील निलंगेकर वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी आमदार झाले. 2009 च्या निवडणुकीत आजोबांनी नातवाला हिसका दाखवला. तर 2014 आणि 2019 मध्ये संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधात काँग्रेसकडून शिवाजी निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर मैदानात होते. पण दोन्ही वेळा ते मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. या मतदारसंघातून गेल्या काही लोकसभा निवडणुकीतही भाजपच्याच उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते. पण यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला 20 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे निलंगा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे.
यंदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्याशिवाय अभय साळुंखे व डॉ. अरविंद भातंब्रे या तिघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित देशमुख यांनी तिघांनाही तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिघेही मतदारसंघात संपर्क वाढवत आहेत. नेमके कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण ‘जरांगे प्रारुपाचा प्रभाव’, मुस्लीम समाजाचे ऐक्य आणि महायुती सरकार बद्दलची नाराजी याचा लाभ महाविकास आघाडीला होईल असा देशमुख यांचा होरा आहे. शिवाय तीन संभाव्य उमेदवारांना समोर ठेवून काँग्रेसने आखणी सुरू केल्याने अनपेक्षितपणे संभाजी पाटील यांना तीन आघाड्यांवर लढावे लागणार आहे.
या सगळ्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर सावध पवित्रा घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारसंघातील सर्व मंडळात ते व्यक्तिगत जाऊन येत असून त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आई माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर असे सगळे कुटुंबच आतापासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. निलंगा मतदार संघात असलेला संपर्क, गेल्या तीन टर्म मध्ये केलेली विकास कामे या जोरावर पुन्हा चौथ्यांदा निवडून येण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांना कसरत करावी लागणार आहे