Nana Patole Allegation On Honey Trap : विधानसभेत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान (Honey Trap) करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. पण मी कोणाचेही चारित्र्यहनन करणार नाही. जर सरकारने परवानगी दिली, तर मी तो पेनड्राइव्ह सभागृहात दाखवायला तयार आहे, असं पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलं.
गोंधळाचं वातावरण
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना पटोले म्हणाले की, हनी ट्रॅपच्या माध्यमातून काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जाळ्यात ओढलं जातं. यामागे एक संगठित रचना काम करत आहे. ही फक्त वैयक्तिक गोष्ट नाही, यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर गंभीर बाबी आहेत. पटोले यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही क्षण गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या आधीही नाना पटोले यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला घेरलं होतं, मात्र हनी ट्रॅपसारखा संवेदनशील मुद्दा सभागृहात इतक्या थेटपणे मांडणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते आणि पटोले यांनी सांगितलेला पेनड्राइव्ह प्रत्यक्षात सादर केला जातो का, याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
काल अधिवेशनात मी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन… pic.twitter.com/r0XFe0Dxba
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 17, 2025
पेनड्राइव्ह प्रत्यक्षात सादर
काल अधिवेशनात मी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधं निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची ही उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. हनीट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन, आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव, या सगळ्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो, की या राज्यात नेमकं चाललंय काय? राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचं जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.