Download App

सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश : कडवा विरोधकच सोबत आल्याने रामदास कदम टेन्शनमध्ये!

रत्नागिरी : खेड-दापोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात येऊन दळवी यांची अडचण केली होती. ही कोंडी फोडण्यासाठी आता दळवी यांनी भाजपची वाट धरली आहे. मात्र दळवी यांच्या भाजप प्रवेशाने आता शिवसेनेचे बडे नेते रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांची अडचण होण्याची शक्यता आहे. (Former Khed-Dapoli Constituency ShivSena MLA Suryakant Dalvi joined BJP)

सूर्यकांत दळवी यांची दापोली-खेड मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यांनीच 1990 साली दापोली मतदारसंघावर पहिल्यांदा शिवसेनेचे भगवा फडकविला. त्यानंतर 1995, 1999, 2004 आणि 2009 असे सलग पाचवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. मात्र 2014 साली शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेल्या संजय कदम यांनी दळवी यांचा साडे तीन हजार मतांनी  पराभव केला, त्यानंतर काही महिने सूर्यकांत दळवी राजकीय विजनवासात गेले होते. त्याचा फायदा घेत शिवसेनचे नेते आणि तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरविले.

विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

सोबतच पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणत कार्यकर्ते आणि मतदारांना खूश केले. मतदारसंघातील शिवसनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळविण्यात त्यांनी यश मिळविले. कदम यांच्या या खेळीने दळवी बाजूला पडले. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अनेक कार्यकर्तेही योगेश कदम यांच्याबरोबर गेल्याने काही मोजकेच कार्यकर्ते दळवी यांच्यासोबत राहिले. यानंतर 2019 च्या निवडणुकीत रामदास कदम यांनी दळवी यांच्यावर कुरघोडी करत त्यांचे तिकीट योगेश कदम यांना मिळवून दिले आणि निवडूनही आणले.

मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देत कदम यांनीही ठाकरे यांच्याविरोधात मोर्चा उघडला. या बंडानंतर दापोली मतदारसंघातील गणितही बदलली. राजकीय विजनवासात गेलेले आणि पक्षापासून बाजूला झालेले दळवी यांना पक्षाने पुन्हा सक्रिय केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी दापोली मतदारसंघाचा दौरा करत तिथे दळवींना ताकद देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची पुन्हा बांधणी करण्यासाठी दापोली शिवसेनेची जबाबदारी सूर्यकांत दळवी यांच्यावर देण्यात आली. मात्र काही दिवसातच राष्ट्रवादीतही बंडखोरी झाली. त्यानंतर संजय कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वाट धरली.

‘बजेट म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार, अर्थमंत्र्यांचं अभिनंदन’; ठाकरेंचे खोचक टीकेचे ‘बाण’

या घडामोडींनंतर आदित्य ठाकरे यांनीही कदम यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना जबाबदारी दिली. माजी आमदार असलेल्या कदम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे संजय कदम यांच्या नावाची घोषणा केली. त्यांची घरी खळा बैठक घेत कार्यकर्त्यांनाही सूचक संदेश दिला. याचमुळे दळवी नाराज झाले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून ते भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा होती. अखेरीस आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र दळवी आणि रामदास कदम यांच्याशी जुळवून घेणार का असा सवाल विचारला जात आहे.

रामदास कदम आणि दळवी यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर आहे. रामदास कदम यांनी आपल्याला पक्षातून साईडलाईन केले, असा आरोप ते सातत्याने करत राहिले. कदम यांच्या बंडानंतर तर दळवी यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. रामदास कदम हे शिवसेनेचे महागद्दार आहेत. 2014 मध्ये मला पाडण्याचे काम रामदास कदम यांनी केले. लोकसभेचे उमेदवार अनंत गिते यांच्याविरोधातही कदम यांनीच कपबशीचा प्रचार केला. पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना अधिकृत उमेदवारांना संपविण्याचे काम वारंवार रामदास कदम करत होते, असा आरोप दळवी करत राहिले. त्यानंतर आता दोघेही एकाच युतीत येत असल्याने आता दळवी-कदम कसे जुळवून घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

follow us