Former MLA Harshvardhan Sapkal has been appointed as the congress state president: राजकीय धक्कातंत्रासाठी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ओळखलं जातं. धक्कातंत्र ही काही काँग्रेसची (Congress) ओळख नाही. पण आमदार अमित देशमुख, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाटी नकार दिल्यानंतर आमदार नितीन राऊत यांचे नाव मागे पडल्यानंतर एक नवीन आणि सरप्राईज नाव अंतिम झाले. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पण अचानक हे नाव कसे समोर आले? आणि नेमके कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
नाना पटोले सुमारे चार वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीत पटोले यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले होते. अनेक उमेदवार त्यांनी ठरवले होते. त्यापैकी बहुतांश विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसने विधानसभेची निवडणूकसुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटीत ते कमी पडल्याने राहुल गांधी चांगलेच संतापले होते. आपल्या हक्काच्या जागा सोडल्याची नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती.
पटोले यांच्या कार्यशैली विषयीसुद्धा अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पटोले यांनी सुद्धा राजीनाम्याची तयारी दर्शवली. त्यानुसार अखेर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजीनामा स्विकारत नाना पटोले यांना नारळ दिला आहे. प्रदेशाध्यक्ष शैक्षणिक संस्था आणि साखर कारखानदार नेत्याकडे द्यावे असा विचार पुढे आला. त्यातून सुरुवातीला आमदार अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत होती. विदर्भातूनच यशोमती ठाकूर यांच्याही नावावर चर्चा झाली. पण देशमुख, पाटील, कदम आणि थोपटे यांनी प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला नकार दिला.
त्यानंतर संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करावी असा विचार पुढे आला. त्यानुसार खासदार वर्षा गायकवाड आणि डॉ. नितीन राऊत यांची नावे पुढे आली. पण मुंबई महापालिकेला निवडणूक तोंडावर असल्याने वर्षा गायकवाड यांना प्रदेशाध्यक्षपदात अडकवले जाऊ नये यावर पक्षश्रेष्ठींचे एकमत झाले. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचे समीकरण पाहता, नितीन राऊत यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. पण राऊत यांचेही नाव मागे पडले.
सगळी नावे मागे पडल्यानंतर ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे. जेणेकरून केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जाणार नाही. त्यातून अचानक प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन आणि आश्चर्यकारक चर्चेत आले. हेच नाव आहे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात. ते मुळचे बुलढाण्याचे आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून 2014 ते 2019 या काळात आमदार होते. पण 2019 मध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला.
सध्या हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पण गत दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी युवक कॉंग्रेस व एन.एस.यू.आय. या युवकांच्या संबंधित दोन संघटनांचे प्रभारी म्हणूनसुद्धा कार्य केलेले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव व अभ्यास लक्षात घेत त्यांच्यावर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
यानंतर त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली. तसेच गुजरात आणि मध्यप्रदेश निवडणुकीमध्ये त्यांनी सहप्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा स्क्रिनिंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला होता. सोबतच पंजाब विधानसभा निवडणुकीत केंद्रीय स्तरावरून स्थापित करण्यात आलेल्या कोअर कमिटीचेसुद्धा ते सदस्य होते. आमदार असताना देखील सपकाळ हे कॉंग्रेस विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित झाले होते..
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी जिवनोत्थान कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये “गळ्यातील ताईत” म्हणून त्यांची ओळख आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवरील आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. 2014 ते 2019 या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.