GOAT चित्रपटाचा सीन ठरला ‘भविष्यवाणी’? विजय थलपतिच्या विजयानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

विजय यांच्या या राजकीय यशासोबतच त्यांच्या GOAT या चित्रपटातील एक सिन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Untitled Design 83

Untitled Design 83

GOAT movie scene turned out to be a prediction : तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ते राजकारणातील नवा चेहरा असा प्रवास करत विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात दमदार एंट्री करत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. त्यांचा टीव्हीके पक्ष विधानसभा निवडणुकीत 234 पैकी तब्बल 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. विशेष म्हणजे, विजय यांच्या या राजकीय यशासोबतच त्यांच्या GOAT या चित्रपटातील एक सिन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये विजय कार चालवत असताना दिसतात आणि त्या कारच्या नंबर प्लेटवर TN 07 CM 2026 असे लिहिलेले दिसते. त्यामुळे आता हा सिन विजय 2026 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील, याचा संकेत असल्याची चर्चा रंगली आहे.

विजय यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये टीव्हीके पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच, 5 सप्टेंबर 2024 रोजी GOAT हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपट आणि वास्तवातील घडामोडी यांची सांगड घालून अनेकजण या सिंकडे पाहत आहेत. दरम्यान, विजयसोबत चित्रपटात काम केलेले प्रेमगी अमरेन यांनी देखील यापूर्वीच विजय मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. 2024 मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, मी 2026 मध्ये त्यांना मतदान करेन, थांबा आणि पाहा, विजय मुख्यमंत्री होतील.

फक्त सहकलाकारचं नव्हे, तर ज्योतिषी राधान पंडित यांनी देखील विजय यांच्या भविष्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली होती. त्यांनी विजय यांच्या कुंडलीला त्सुनामी असे संबोधत तामिळनाडूच्या राजकारणात मोठी लाट निर्माण होईल, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, राधान पंडित हे माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे देखील आध्यात्मिक मार्गदर्शक होते.

सरकारचा मोठा निर्णय! भारतात खेळण्याची पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी

याचदरम्यान, अभिनेत्री पूजा हेगडे हीचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जन नायकनच्या सेटवरील या व्हिडिओमध्ये व्हाईटबोर्डवर निवडणूक कोण जिंकेल? असा प्रश लिहिलेला दिसतो. पूजा हा प्रश्न दाखवते आणि कॅमेरा विजयाकडे वळवते, त्यावर विजय लाजून हसताना दिसतात. राजकीय गणित पाहता टीव्हीके पक्ष 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी काही जागांची कमतरता आहे. दुसरीकडे डीएमकेला 59 तर एआयएडीएमके ला 47 जागा मिळाल्या आहेत.

मात्र, सत्तास्थापनेसाठी समीकरणे जलदगतीने बदलत असून काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्ष आणि विदुथलै चिरूटाइगल काची या पक्षांकडून टीव्हीकेला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विजय यांनी तिरुचिरापल्ली आणि पेरांबूर या दोन मतदारसंघातून विजय मिळवला असून, ते त्रिची ही जागा सोडण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, चित्रपटातील CM 2026 या संकेतांपासून ते प्रत्यक्ष राजकारणातील यशापर्यंतचा विजय यांचा प्रवास सध्या तामिळनाडूसह देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Exit mobile version