माझ्या आमदाराची सही बनावट; टीटीव्ही दिनकरनांचा विजयच्या पक्षावर थेट हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
दिनकरन यांच्या मते, त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांच्या स्वाक्षरीचे बनावट समर्थन पत्र तयार करून ते राज्यपालांना सादर करण्यात आले.
Dinakaran enters Raj Bhavan directly with MLA : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. मात्र बहुमताच्या आकड्यापासून काही जागा दूर असल्याने सरकार स्थापनेसाठी आवश्यक आमदारांचे समर्थन मिळवण्यासाठी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
टीव्हीकेने 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत राज्यपालांकडे समर्थन पत्र सादर केले. यानंतर विजय सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र मध्यरात्री घडलेल्या नाट्यमयी घडामोडींनी संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेले. एएमएमके पक्षाचे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी टीव्हीके वर गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांच्या स्वाक्षरीचे बनावट समर्थन पत्र तयार करून ते राज्यपालांना सादर करण्यात आले. दिनकरन यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमदार कामराज यांनी प्रत्यक्षात एआयएडीएमके आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एडपड्डी पलानीस्वामी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनकरन यांनी राज्यपालांची भेट घेत मूळ समर्थन पत्र सादर केले आणि टीव्हीकेने दिलेले पत्र हे बनावट फोटोकॉपी असल्याचा आरोप केला. हा प्रकार लोकशाही आणि घटनात्मक प्रक्रियेची फसवणूक करणारा असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्याचा इशारा देखील दिला. तसेच एआयएडीएमकेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोठा आर्थिक झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
दरम्यान, आरोपणानंतर टीव्हीके पक्षाने प्रत्युत्तर देताना आमदार एस. कामराज यांचा एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये कामराज हे विजय यांना पाठिंबा देत असल्याचे सांगताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर टीटीव्ही दिनकरन यांच्या संमतीनेच मी हा निर्णय घेतला आहे, असे देखील ते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसले. मात्र या व्हिडिओनंतर प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले. टीटीव्ही दिनकरन यांनी आपले आमदार एस. कामराज बेपत्ता असल्याची तक्रार राज्यपालांकडे केली.
त्यानंतर मध्यरात्री उशिरा दिनकरन स्वतः कामराज यांना सोबत घेऊन राजभवनात पोहोचले. यावेळी कामराज यांनी एआयएडीएमकेलाच पाठिंबा असल्याचे नवीन पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर दिनकरन यांनी चेन्नईतील गिंडी पोलीस ठाण्यात टीव्हीके विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. बनावट समर्थन पत्र सादर करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर असलेल्या विजय यांच्या टीव्हीके पक्षासमोर आता मोठे राजकीय आणि कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे.