नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे नागपूर ( Nagapur ) येथे दाखल झाले आहेत. मनी लाँड्रींग प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख प्रथमच आपल्या नागपूरच्या घरी आले आहेत. यावेळी त्यांनी आपला २१ महिने छळ झाल्याचा आरोप केला आहे.
सचिन वाझेला दोन खुनाच्या आरोपात अटक झाली होती, त्याचा जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. 14 महिने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात काढावे लागले. ऑर्थररोड जेलमध्ये ज्या बिल्डिंग मध्ये ठेवलं, त्या बिल्डिंगमध्ये आतंकवादी कसाबल ठेवलं होतं. या संपुर्ण प्रकारात माझा 21 महिने छळ झाला, असा आरोप देशमुखांनी केला आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबियांना या प्रकरणाने त्रास झाला. 230 सहकाऱ्यांचे जबाब घेण्यात आले. 130 धाडी टाकण्यात आल्या, न्याय देवतेने मला जामीन दिल्याबद्दल मी न्याय देवतेचे आभार मानतो, असेही देशमुख म्हणाले.
यात कोणाचा अदृश्य हात आहे हे सगळ्यांना माहिती आहे. या सर्व काळात मतदार संघात जाऊ शकलो नाही, माझा मुलगा सलील आणि सहकारी यांनी सातत्याने मतदार संघातील लोकांशी संपर्क ठेवला होता. सध्या शेतकरी अडचणीत आहे, कापसाला भाव नाही, कापसाची आयात करण्यात आली आहे. शासन निर्यात करत नाही, तोपर्यन्त भाव वाढ होणार नाही, आयात होऊ नये यासाठी पाऊल उचलावे लागेल. कॉपरेटिव्ह बँकेचे कर्ज न भरणाऱ्याची जमीन लिलावात काढली, ही भूमिका चुकीचे आहे. केंद्रसरकार उद्योगपतींचे कर्ज माफी करते, तर शेतकऱ्यांचे देखील करायला पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री याना पत्र लिहिले आहे, अशी माहिती देखील देशमुख यांनी दिली.
या सर्व प्रकरणात पहिल्यादिवसापासून शरद पवार आमच्या कुटूंबियांसोबत होते. त्यांना धीर देण्याचे काम त्यांनी केले.
सर्व प्रमुख नेत्यांनी सहकार्य केले. माझे सर्व कुटुंब माझ्या पाठीशी आहे. शरद पवार साहेब नागपूरात येणार आहेत तेव्हा मी त्यांच स्वागत करण्यासाठी जाणार आहे, असे देशमुखांनी सांगितले.