Download App

पंकजा मुंडेंना ठाकरे गटाच्या आमदाराने दिली ‘ही’ ऑफर

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेला येतो. यावेळी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत बोलताना शिवसेनेच्या एका नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटातील एका आमदाराने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका दौऱ्यावर होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यांनतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली.

सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांवर टीका
देशातील सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि सीबीआय यांसारख्या स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे, असं म्हणत सुनील शिंदे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

Tags

follow us