Maharashtra politics : गेल्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असलेले सरकार कोसळले होते. शिंदेंच्या बंडखोरीला काल एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे 20 जून हा दिवस ठाकरेंच्या शिवसेनेने ‘खोके दिवस’ म्हणून साजरा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा केला. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांवर गद्दार म्हणून सातत्याने टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला गद्दारी करायची असती तर नारायण राणे, राज ठाकरे यांनी बंड केले तेव्हाच गद्दारी केली असती, असे त्यांनी म्हटले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की घर, संसार यावर तुळशीपत्र ठेऊन काम केलेली माणसं आहोत आम्ही. गद्दारी करायची असती तर नारायण राणेंनी केली त्यावेळेस केली असती, त्यावेळी देखील आम्ही आमदार होतो. त्यावेळेसही ऑफर होत्या. राज ठाकरे गेले त्यावेळी देखील गद्दारी करु शकलो असतो.
शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!
ते पुढं म्हणाले की आपल्या नेत्यांनी चांगले कार्यकर्ते सोडून गेल्यानंतर पुन्हा बोलवण्याचा प्रयत्न का केला नाही? हा माझा सवाल आहे. हा प्रयत्न केला असता तर आमच्यासारख्या आमदारांची मन बदलली असती. हा माणूस प्रयत्न करतोय तर मग हे का ऐकत नाहीत असा विचार केला असता. तोही प्रयत्न केला नाही. उलट आम्ही सांगायला गेलो तर ‘तुम शेर जैसे दिखतो हो और दिल चुहे जैसा’ तुला जायचं असेल तर जाऊ शकतो. हे संजय राऊत यांचे वाक्य होते. त्यांनीच शिवसेनेची वाट लावली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?
गद्दारीच्या मुद्द्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केल्याचं पाटील यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे नाराज आहेत का? असा देखील त्यांनी सवाल केला आहे. तसेच संजय राऊत यांनीच पक्षाची वाट लावल्याचा पुर्नउच्चार गुलाबराव पाटील यांनी केला.