मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊतांनी केलेल्या आरोपावरून आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊतांनी हा आरोप केल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे, ते तपास करतील. केवळ श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत यांनी खोटे आरोप केले आहेत. राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांच्यावर इलाज होणं गरजेचं आहे. असंबंध बोलणे हाच त्यांचा उद्देश आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका म्हस्के यांनी केली आहे.
सध्या संजय राऊतांची सुरक्षा कमी केलेली आहे, असं दिसतं. आपली सुरक्षा वाढावी, पोलिसांवर इंप्रेशन मारता यावं, यासाठी त्यांनी हे आरोप केले असतील, असा टोलाही मस्के यांनी लगावला. म्हस्के यांनी सांगितले की, श्रीकांत शिंदे गेल्या आठवड्यापासून आजारी आहेत. त्यांचा आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे. त्यामुळे असा प्रकार होऊ शकत नाही. तर संजय राऊतांनी केलेले आरोप ही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचं दिसतंय असा संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर आता दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
MPSC New Syllabus : आयोगाच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार : फडणवीस
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीय की नाही असा सवाल उपस्थित होत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.
एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे, दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे, अशाच तापलेल्या राजकीय वातावरणात आता राऊत यांनी हा आरोप केला आहे. त्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कोणत्या थराला जातो आहे, याची प्रचीती येत आहे.