लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे चित्र अचानक बदलेले. मोहिते कुटुंबाने भाजपला (BJP) रामराम ठोकत थेट तुतारी हाती घेतली. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) लोकसभेच्या मैदानात उतरले. या दरम्यान, धैर्यशील मोहितेंनी सर्वाधिक राग कोणावर काढला असेल तो माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर. “राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी मोहिते पाटील म्हणाले, मला आज एकाच माणसाला उत्तर द्यायचं आहे. दादांच्या सांगण्यावरुन एका रात्रीत तुला आमदार केला. आता एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची धमक आमच्यात आहे.” हे एकच वाक्य यंदा माळशिरस मतदारसंघाची निवडणूक कशी होणार, हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. (In the Malshiras Assembly Constituency will fight between BJP’s Ram Satpute and NCP’s Sharadchandra Pawar’s Uttamrao Jankar)
गतवर्षी ज्या माळशिरसमधील लीडच्या जोरावर भाजपचे खासदार निवडून आले, राम सातपुते माळशिरसमधून आमदार झाले, त्याच माळशिरसवर मोहिते पाटील कुटुंबांचा एकहाती होल्ड आहे. 1962 ते 2009 या 47 वर्षांत एक निवडणूक सोडल्यास या मतदारसंघावर मोहिते पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. 1962 आणि 1967 असे सलग दोन टर्म शंकरराव मोहिते पाटील विजयी झाले. पण 1972 च्या दुष्काळात विजयसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा अंगलट आला आणि काँग्रेसने शंकरराव मोहिते पाटील यांचे तिकीट कापले. पण उमेदवार मोहिते पाटील यांच्याच मर्जीतील होता. चांगोजीराव आबासाहेब देशमुख हे काँग्रेसकडून बिनविरोध निवडून आले. 1978 मध्ये मात्र शंकरराव मोहिते यांना पराभव सहन करावा लागला.
1980 मध्ये शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील अपक्ष रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. विजयसिंह मोहिते यांची राजकीय कारकीर्द अकलूजचे सरपंच म्हणून सुरु झाली होती. त्यानंतर 1971 ते 1979 या कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. 1980 ते 2009 पर्यंत या मतदारसंघातून तब्बल सहा टर्म आमदार राहिले. आधी काँग्रेस अन् मग राष्ट्रवादीमध्ये आल्याने त्यांना राजकीय मायलेज मिळाले. याच आमदारकीच्या जोरावर ते उपमुख्यमंत्री झाले. सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री राहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सहकारी साखर कारखाने, दूध डेअरी, पोल्ट्री फार्म, शाळा सुरू केल्या. पण 2008 च्या मतदारसंघ पुर्नरचनेत माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव झाला. त्यामुळे मोहिते यांना हक्काचा मतदारसंघच राहिला नाही.
त्यानंतर 2009 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूर विधानसभा संघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहिले. पण भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला. इकडे माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे हणमंतराव डोळस आमदार झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव केला. डोळस यांना 82 हजार 360 हजार मते मिळाली होती. तर अपक्ष उत्तमराव जानकर यांना 66 हजार 134 मते मिळाली होती. 2014 ला हणमंतराव डोळस आणि उत्तमराव जानकर यांच्यात फाइट होणार होती. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे उमेदवार डोळस हे जानकरांविरोधात मुंबईत हायकोर्टात गेले होते. जानकर हे धनगर आहेत. पण त्यांच्याकडे हिंदू खाटीक असे जात प्रमाणपत्र आहे. ते बनावट आहे, असा दावा डोळस यांनी केला होता. त्यानंतर चौकशीत जानकर यांचे प्रमाणपत्र रद्द झाले. त्यामुळे 2014 ची निवडणूक ते लढू शकले नाहीत.
त्यावेळी हणमंतराव डोळस हे 77 हजार 179 मते घेऊन विजयी झाले. त्यांना अपक्ष उमेदवार अनंत खंडागळे यांनी फाइट दिली होती. खंडागळे यांना 70 हजार 934 मते मिळाली होती. शिवसेनेचे लक्ष्मण सरवदे यांना 23 हजार 537 मते मिळाली होती. निवडणुकीनंतर मात्र जानकर यांचे प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादीत आले. तर विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे कुटुंब भाजपवासी झाले होते. मोहिते पाटलांच्याच मदतीने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले होते. त्यांना माळशिरसमधून एक लाखाचे लीड मिळाले. त्यानंतर विधानसभेला भाजपने राम सातपुते यांना मैदानात उतरवले. मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारण आलेले होते. या लढाईत सातपुते हे अवघ्या 2400 मतांनी निवडून आले. सातपुते यांना एक लाख 3 हजार 507 मते मिळाली होती. तर जानकर यांना 1 लाख 917 मते मिळाली होती.
गत पाच वर्षांमध्ये मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडल्या. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या दोघांनीही मोहिते पाटील यांच्याशी फारसे जुळवून घेतले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने दोन्ही नेत्यांनी राजकारण सुरु ठेवले. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केले पण मंत्रीपदाचा शब्द पूर्ण झाला नाही, याची खदखदही मोहिते पाटलांच्या मनात होती. त्यामुळे मोहिते पाटलांचे सातपुते आणि नाईक निंबाळकर यांच्याशी सतत राजकीय खटके उडत होते. यंदा लोकसभेला मोहिते पाटील यांनी भाजपकडे उमेदवारीचा आग्रह धरला. पण अगदी पहिल्याच यादीत भाजपकडून नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यातूनच अखेर धैर्यशील भाजपला राम राम ठोकला आणि तुतारी फुंकली. त्यानंतर माळशिरसचे राजकारण बदलत गेले. मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक हे उत्तमराव जानकर हेही शरद पवार गटात दाखल झाले.
लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आहेत. माळशिरस मतदारसंघातून त्यांना 70 हजारांचे लीड आहे. आता विधानसभेला मोहिते पाटलांनी माळशिरमध्ये उत्तमराव जानकर यांच्यामागे ताकद उभी केली आहे. शरद पवारांनाही त्यांना उमेदवाराची शब्द दिलेला आहे. जानकर यांचे माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जानकर हेच असणार आहेत. तर राम सातपुतेंवर असलेल्या प्रचंड राजकीय रागामुळे त्यांचे पार्सल पुन्हा बीडला पाठवण्याचा निश्चिय मोहिते पाटील यांनी केला आहे. त्याचवेळी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीला मोहिते पाटलांनी दिलेला धक्का देवेंद्र फडणवीस विसरलेले नाहीत. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघात मोहितेंची कोंडी करण्याचे प्लॅनिंग आहे. त्यामुळे यंदा माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर असा राज्यभर गाजणारा सामना रंगणार हे तर नक्की.