Download App

राणा जगजितसिंह पाटलांना 90 वर्षांच्या तरुणांच तगडं आव्हान; आमदारकी सोपी नाही!

  • Written By: Last Updated:

85 वर्षांचा लढवय्या तरुण म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना ओळखलं जातं. पुतण्याने साथ सोडली, पक्ष गेला, चिन्ह गेले तरी खचून न जाता पवार लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) सामोरे गेले आणि आठ खासदारही निवडूनही आणले. असाच आणखी एक 90 वर्षांचा लढवय्या तरुण आहे तुळजापूरमध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांच्याही लढवय्यापणाची सध्या जोरदार चर्चा आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मधुकर चव्हाण यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यामुळे मधुकर चव्हाणही काँग्रेसची साथ सोडणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. पण या प्रश्नांचे उत्तर स्वतः मधुकर चव्हाण यांनीच त्यांच्या कृतीतून दिले.

हाडामांसाचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे म्हणत धोतराचा कोपरा हातात धरुन मधुकर चव्हाण महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरले. धाराशिवचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या जोडीने फिरले. ज्या वयात आराम करायचा, त्याच वयात त्यांनी वादळी भाषण करत प्रचार सभा गाजवल्या. तरुणांना स्फुर्ती दिली. आता हेच चव्हाण विधानसभा निवडणूक लढविण्यासही इच्छुक आहेत. तशी त्यांनी घोषणाच केली आहे. पण शेवटी पक्ष सांगेल तो आदेश पाळणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते भाजपचे नेते आणि विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे. त्यामुळे यंदाची तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार हे नक्की आहे.

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहुया, तुळजापूर मतदारसंघातील सद्यस्थिती नेमकी काय आहे…

तुळजापूर मतदारसंघात पूर्वीपासून काँग्रेस विरुद्ध शेकाप अशीच लढत होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे स्थान इथे असले तरीही हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या शिवसेना आणि भाजपला इथे रुजायला खूप वेळ लागला. युतीमध्ये 2009 पर्यंत तर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. पण सेनेला कधीही इथे यश मिळाले नाही. 1995 मध्ये राज्यात सेनेची सत्ता आली तरीही तुळजापूरमध्ये सेनेला मते होती अवघी सात हजार. 1962 सालच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे साहेबराव हंगरगेकर विजयी झाले होते. त्यानंतर 1967 आणि 1972 सलग दोन टर्म काँग्रेसचे शिवाजीराव पाटील बाभळगावकर हे विजयी झाले.

1978 मध्ये पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाने येथून बाजी मारली. माणिकराव खपले यांनी शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला. पण 1980 मध्ये इंदिरा काँग्रेसच्या सिद्रामप्पा आलुरे यांनी माणिकराव खपले यांचा पराभव केला. 1985 मध्ये आलुरे यांचा पराभव करून खपले पुन्हा आमदार झाले. त्यानंतर या मतदारसंघात मधुकरराव चव्हाण यांचा उदय झाला. 1990 मध्ये चव्हाण यांनी खपले यांना पराभवाचा झटका दिला. पण 1995 मध्ये खपले यांनी मधुकरराव चव्हाण यांचा तब्बल 26 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 आणि 2014 असे सलग चार टर्म मधुकरराव चव्हाण येथून निवडून आले.

आवताडे, पाटील की भालके… ‘विठ्ठल’ कोणाला पावणार? परिचारक गेम फिरवणार?

चव्हाण यांनी 1990 पासून 2019 पर्यंत या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवले. या दरम्यान, 2008 च्या पुनर्रचनेत तुळजापूर तालुका आणि धाराशिव तालुक्यातील तीन महसूल मंडळांचा मिळून तुळजापूर मतदारसंघ तयार झाला. 2009 मधील निवडणुकीतच भाजपला इथे खरा बुस्ट मिळाला. त्यावेळी सुभाष देशमुख यांना भाजपने मैदानात उतरवले. त्यांनी भाजपचे केडर अॅक्टिव्हेट केले. त्यावर्षी 50 हजारापर्यंत पोहचली. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. त्यात चव्हाण यांना 70 हजार मते मिळाली होती. तर दुसऱ्या नंबरवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवन गोरे यांना 41 हजार आणि भाजपच्या संजय निंबाळकर यांना 36 हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे सुधीर पाटील हे 24 हजार 991 मते घेऊन पाचव्या क्रमांकावर होते.

या मतदारसंघात देवानंद रोचकरी यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. ते कोणत्याही पक्षाकडे गेले तरी 40 हजारांच्या आसपास मते त्यांना मिळतातच. 2004 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यात 37 हजार मते त्यांनी घेतली होती. 2009 मध्ये शेकापकडून 45 हजार, 2014 मध्ये मनसेकडून 36 हजार मते त्यांनी घेतली होती. पण या सगळ्या साठमारीत मधुकर चव्हाण आपले वर्चस्व टिकवून होते. चव्हाण यांना धक्का बसला तो 2019 मध्ये. त्यावर्षी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगतिसिंह पाटील हे भाजपमध्ये गेले. त्यांचा उस्मानाबाद मतदारसंघ जागा वाटपात शिवसेनेला सुटला. त्यामुळे भाजपने त्यांना शेजारच्या तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

विधानसभा निवडणुकीच्या अवघे चार महिने आधी राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढले होते. त्यात त्यांचा पराभव तर झालाच होता. पण तुळजापूर मतदारसंघातूनही ते 22 हजार मतांनी मायनसमध्ये होते. त्यामुळे विधानसभेला त्यांचा निभाव कसा लागणार? असा सवाल विचारला जात होता. त्यातच अनुभवी मधुकर चव्हाण यांचेही आव्हान त्यांच्यापुढे होते. पण पाटील यांनी यांनी मधुकर चव्हाण यांचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत विजय मिळविला. पाटील यांना 99 हजार 034 मते मिळाली होती. तर चव्हाण यांना 75हजार 865 मते मिळाली होती. वंचितचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी 35 हजार 383 हजार मते घेतली होती.

यंदा लोकसभेला गणिते काहीशी गतवेळी सारखीच राहिली आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात निधी आणून विकासकामे केलेली आहेत. तरीही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मताधिक्य मिळू शकले नाही. राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेल्या अर्चना पाटील यांना 86 हजार मते मिळाली होती. तर ओम राजेनिंबाळकर यांना एक लाख 38 हजार मते मिळाली. निंबाळकरांना तब्बल 52 हजार मतांची आघाडी मिळाली.

या लोकसभेला मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा आणि तुळजाभवानी साखर कारखान्याची जबाबदारी संभाळत असलेले सुनील चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आजारी कारखान्याला कर्ज मिळेल हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. शिवाय देवानंद रोचकरी यांनीही पाटील अर्चना पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र याचाही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे 52 हजारांचे लीड राणा जगजितसिंहांना धोक्याची घंटा मानली जाते. पण गतवेळचा अनुभव लक्षात घेता विधानसभा आणि लोकसभेची राजकीय गणिते वेगळी असतात हे नक्की.

आता मुख्य प्रश्न म्हणजे राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात कोण शड्डू ठोकणार? राणा जगजीतसिंह पाटील यांचे निकटवर्तीय अशी ओळक असलेल्या विनोद गंगावणे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांचे तुळजापूर शहरात राजकीय वजन आहेत. नगरपरिषदेचे नगराध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवारी करण्यासाठी महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच आहे. काँग्रेसकडून स्वतः 90 वर्षी मधुकर चव्हाण हे लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तसे जाहीरही केलेले आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ते दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अशोक जगदाळे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. निवडणुकीचीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून ही जागा मागितली जात आहे. परंतु त्यांच्याकडून प्रबळ उमेदवार अद्याप तरी समोर आलेला नाही. एकूणच लोकसभा निवडणुकीत राणा जगजीतसिंह पाटील यांना बसलेला धक्का, महाविकास आघाडीत असलेली इच्छुकांची संख्या पाहता यंदा ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की.

follow us