Murlidhar Mohol : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. 36 तासाहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागत असं म्हणत या वर्षापासून पुण्यातील अनेक मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या मिरणुकीच्या (Pune Ganeshotsav 2025) आधी आपली मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावरुन पुण्यात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता हा वाद मिटला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या प्रकरणात एक बैठक घेत हा वाद मिटवला आहे. विसर्जन मिरवणूक परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच गणेश मंडळात काही वाद नव्हते. चर्चाकरुन आम्ही निर्णय घेतला असल्याची देखील माहिती माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक सकाळी 9.30 पासून सुरु होणार आहे. चर्चाकरुन जो मार्ग काढायचा होता तो आम्ही काढला आहे. आमच्यात कुठलाही वाद नव्हता असं देखील मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
परंपरेनुसारच होणार पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाची देदीप्यमान मिरवणूक…
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीसंदर्भात आज गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींशी आज चर्चा करत परंपरेनुसारच मिरवणूक काढण्यासंदर्भात एकमत झाले. या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी साधलेला… pic.twitter.com/1ADKvZyRRN
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 22, 2025
नेमकं वाद काय?
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पाच मनांच्या गणपती मंडळाचा आणि इतर मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरुन वाद सुरु होता. मानाचे विरुद्ध कामाचे असा वाद पुण्यात सुरु होता. 36 तासाहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागत असल्याने या वर्षापासून मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीच्या आधी आपली मिरवणूक काढण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला होता. मात्र आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत वाद मिटवला आहे.