Download App

CM शिंदेंच्या ‘त्या’ जाहिरातीला महाशक्तीचा आशीर्वाद? श्रीकांत शिंदें-अमित शाहंची पर्सनल कामासाठी भेट

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची नुकतीच भेट झाली असल्याची माहिती आहे. दिल्लीत श्रीकांत शिंदे यांनी शाहंची भेट घेतली. शिंदे यांनी भेटीची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. अशातच आज (१५ जून) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता आहे, शाह गृहमंत्री आहेत. दिल्लीत अनेक काम असतात, पाठपुरावा असतो, अनेक भेटी असतात. खासगी कामही असतात, ती तुम्हाला नाही सांगू शकत, असं म्हणतं शाहंची भेट खासगी कामासाठी होती असं सांगितलं. ( Is CM Shinde Advertisement support by Center Government Shrikant Shinde Met Amit Shah for personal reason )

‘मुख्यमंत्र्यांची माफी मागा, अन्यथा परिणाम भोगा’; बच्चू कडूंचा भाजप खासदाराला इशारा

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडे, देशाच्या गृहमंत्र्यांकडे शिवसेनेच्या खासदाराचे आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सुपुत्राचे काय खासगी काम असावे अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. अशात आता दबक्या आवाजात नुकत्याच राज्यात गाजलेल्या जाहिरात प्रकरणाचाही संदर्भ देण्यात येत आहे. यातून फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यासाठी या जाहिरातीला केंद्रातील नेत्यांचा आशीर्वाद होता का? असा सवालही विचारला जात आहे.

काय आहे जाहिरात वाद?

मागील 3 दिवसांपासून राज्याचे राजकारण वर्तमानपत्रातील दोन जाहिरातींभोवती फिरत आहे. यातील पहिली जाहिरात होती ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ असं सांगणारी आणि यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून जनतेतील पसंतीच्या टक्केवारीच्या तुलनेची. या जाहिरातीवरुन प्रचंड वाद झाला. भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी त्यांचे दोन दिवसांचे दौरे रद्द केले.

Shinde VS Fadanvis : शिंदे- फडणवीस एकाच मंचावर; जाहिरातवादानंतरची नाराजी समोर येणार?

त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात दुसरी जाहिरात झळकली. यात शिंदे आणि फडणवीस या दोघांचाही फोटो आणि दोघांच्या जोडीला जनतेचा आशीर्वाद असं सांगणारी. ही जाहिरात म्हणजे शिंदेंनी केलेले डॅमेज कंट्रोल असल्याचे बोलले गेले. तर केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांमुळे शिंदेंनी जाहिरात बदलली असा दावा विरोधकांनी केला. शिंदेंच्या गोटातून मात्र या दोन्ही चर्चांना फुलस्टॉप देत पहिली जाहिरात आम्ही दिलीच नव्हती, ती आमच्या हितचिंतकांनी दिली होती असा दावा करण्यात आला. तर दुसरी जाहिरात मात्र आम्ही दिली होती असं सांगण्यात आलं.

या दोन्ही आरोप प्रत्यारोपांदरम्यान, एक चर्चा दबक्या आवाजात होत होती ती म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली जाहिरात देणाऱ्या त्या कथित हितचिंतकाला केंद्रातील महाशक्तीचा तर आशीर्वाद नव्हता ना? राज्यात मागील वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण सुरु आहे, अशा चर्चा वारंवार होत असतात. यात प्रमुख्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन याची सुरुवात झाली. असं बोललं गेलं होतं. तसंच फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी नेत्यांना म्हणजेच विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा ताकद देण्यात आली. अमित शाह यांनीच भविष्यातील राजकारण लक्षात घेऊन फडणवीस यांचं डिमोशन केलं, फडणवीस यांचे पंख कापले, असं बोललं गेलं. या जाहिरात वादानंतर लगेचच श्रीकांत शिंदे यांनी अमित शाहंची खासगी कारणासाठी भेट घेतल्याने या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळालं आहे.

अमित शाहंच्या भेटीवर श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

पत्रकारांनी दिल्लीच्या प्रश्नाबद्दल छेडताच, श्रीकांत शिंदे म्हणाले, अरे दिल्लीला मी माझ्या खासगी कामासाठी गेलो होतो. मी कुठेही गेलो, कुणाला सांगून नाही गेलो. तुम्हा लोकांना कसं कळत? मी दिल्लीला गेलो म्हणून, गेलो होतो ना दिल्लीला. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. अमित शाह खूप मोठे नेते आहेत. मी खासदार आहे. दिल्लीत अनेक काम असतात. पाठपुरावा असतो. त्याचबरोबर अनेक भेटी असतात. खासगीही कामं असतात. ते तुम्हाला नाही सांगू शकत. त्यामुळे प्रत्येत गोष्टीला नवं वळणं देणं चांगलं नाही. आम्हाला आमचा पर्सनल स्पेसही आहे. त्यातही तुम्ही दिल्लीला गेलो की कॅमेरामन, मुंबई एअरपोर्टवर कॅमेरामन हे चांगलं नाही. अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Tags

follow us