पुढील 3 वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई आणि सिंगापूरलाही मागे टाकेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री म्हणाले की, जर महाराष्ट्र हा स्वतंत्र देश असता, तर जगातील अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30 व्या क्रमांकावर असती.

  • Written By: Published:
Untitled Design 2

Maharashtra’s economy will surpass UAE and Singapore in the next 3 years : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्वपूर्ण विधान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मांडला. मुख्यमंत्री म्हणाले की, जर महाराष्ट्र हा स्वतंत्र देश असता, तर जगातील अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30 व्या क्रमांकावर असती. जगातील पहिल्या 35 अर्थव्यवस्थांच्या विचार केला, तर महाराष्ट्राने अनेक देशांना मागे टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्व्हे, फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांचा समावेश असल्याचं त्यांनी नमूद केले.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राने आपला आर्थिक वाढीचा दर कायम ठेवला, तर पुढील दोन ते तीन वर्षांत दुबई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकण्याची क्षमता राज्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विस्तार या देशांपेक्षा देखील मोठा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या कर्जस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सकाळ उत्पन्नाशी तुलना केली असता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे.

अनेक राज्यांचे कर्ज प्रमाण 36 टक्क्यांपर्यंत पोहोचले असताना महाराष्ट्राचे कर्ज प्रमाण केवळ 18 टक्क्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्याची कर्ज घेण्याची क्षमता अजिनाही भरपूर असल्याचे ते म्हणाले. कर्ज वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यापेक्षा ते कर्ज नेमके कुठे खर्च होत आहे, यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांसाठी घेतलेले कर्ज राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर करा, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची टीका

विरोधकांकडून तेलंगणा राज्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तेलंगणाकडे हैद्राबाद सारखे मोठे आर्थिक केंद्र आहे, त्यामुळे त्यांच्या दरडोई उत्पन्नाचा आकडा जास्त दिसतो. मात्र महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवूनही वित्तीय शिस्त कायम ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज यांसारख्या योजना राबवल्यानंतरही राज्याची राजकोषीय तूट केवळ 2.78 टक्क्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याउलट तेलंगणाची राजकोषीय तूट साडेतीन टक्क्यांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. महसुली तुटीबाबतही राज्याने नियंत्रण ठेवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याची महसुली तूट एक टक्क्यांच्या आत असल्याचे त्यांनी नमूद केले. 2019-20 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची महसुली तूट सुमारे 41 हजार कोटी रुपये होती. ती आता सुमारे 40 हजार कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात सरकारला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या महसुली उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 2013-14 साली राज्याची महसुली जमा सुमारे 1 लाख 55 हजार कोटी रुपये होती. ती आता वाढून सुमारे 6 लाख 16 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. या सर्व आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत दिशेने पुढे जात असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

follow us