नागपूर : ‘रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे ! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते. जय महाराष्ट्र !’ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशी प्रतिक्रिया दिली.
राज्यात सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यादरम्यान मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. मुख्यमंत्री सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसंच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.
त्यानंतर त्यांच्या या रेशिमबागेत जाण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी यावोळी मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांना त्यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडाची आठवण करून देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते असा सल्लाही दिला आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.