राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Mahesh Aher ) यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आव्हाडांना आज अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत महेश आहेर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
काही दिवसांपूर्वी आव्हाडांची मुलगी व जावई यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा आहेर यांचा आहे, असे आव्हाडांचे म्हणणे आहे. आज आव्हाडांच्या मुलीने देखील पत्रकार परिषद घेत याबाबतचे आरोप केले आहे. ठाणे पोलिसांनी अद्याप आमची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे आव्हाडांच्या मुलीने सांगितले. तसचे या धमकीमुळे माझ्या सासू-सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला घरातच ठेवले आहे. त्याला बाहेर पडू देत नाही आहेत. माझ्या घरी सर्व घाबरले आहेत, असे आव्हाडांच्या मुलीने सांगितले. तसेच अद्याप आम्हाला पोलिसांकडून कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही, असेही आव्हाडांच्या मुलीने सांगितले.
दरम्यान आव्हाडांनी यावेळी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आहेर यांचे शिक्षण कमी झालेले असून देखील त्यांना प्रमोशन कसे मिळाले, असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मला वेगेवेगळ्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच ऑडिओ क्लिपच्या फॉरेन्सिक टेस्टमध्ये हा आवाज आहेर यांचा नाही, असाच रिपोर्ट येणार असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांना मिळालेल्या धमकीवर त्याची सखोल चौकशी करणार असे सांगितले आहे.