राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आव्हाडांना फटकारले आहे.
आव्हाडांचे विधान चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान महाराष्ट्रात वेगळे आहे. त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. ते होते म्हणून शिवाजी महाराजांचे नाव आहे, हे विधान योग्य नसून त्याउलट छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून त्यांचे नाव उरले नाही तर त्यांचे नाव कुठेही उरले नसते, असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला आहे. तसेच आमची आघाडी असली तरी आमचे पक्ष वेगळे आहेत. शिवसेनेचा विचार वेगळा आहे, असेही दानवेंनी यावेळी सांगितले.
त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरुन महाविकास आघाडीतच वाद पहायला मिळत आहे. त्यांच्या विधानावरुन ठाकरे गट आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. माझे विधान हे बरोबर असून संदर्भासहित असल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे. मात्र आव्हाडांच्या विधानावरुन शिवप्रेमींमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलं होत.
शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान एका ट्वीटद्वारे आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले आहेत.