Jitendra Awhad onKirit Somayya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वेगळाच सुर पकडला आहे. व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याचं राजकीय जीवन संपवायचं, याचा मी निषेध करतो, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं. (Jitendra Awhad reacts to Kirit Somaiyas offensive video)
काल सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब यांनी (Ambadas Danve) या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत सोमय्यांवर गंभीर आरोप केले. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अकोल्यात ठाकरे गटाने सोमय्यांविरोधात मोठं आंदोलन केलं. दरम्यान, विरोधकांना कायम ईडीचा धाक दाखवणारे सोमय्या आता कथित व्हिडिओ प्रकरणामुळं विरोधकांच्या कात्रीत सापडले. मात्र, आव्हाडांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. राजकारण्यांनी थोडीशी संवेदनशीलता बाळगली पाहिजे, असं ते म्हणाले.
राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2023
आव्हाड यांनी ट्विट करत लिहिलं की, राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करू एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर परिणाम होतो. आपला तो आपला राजकीय शत्रू जरी असला तरी तो विचारांचा शत्रू आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करून त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाही नाही, असं ते म्हणाले.
ते म्हणाले, एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत. हे काही योग्य नाही, असं मला वाटतं. राजकारण्यांनी थोडीशी संवेदनशीलता बाळगली पाहिजे. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्दवस्त करणं हे फार सोप्पं आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उद्धवस्त करणं, हे मला तरी पटत नसल्याचं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी एक प्रसंग सांगितला, 1995 मध्ये मी शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवारांना मी सांगितलं की, साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. त्यांनी माझ्या हातातून सातबारा घेतला आणि ड्रॉवरमध्ये ठेवला आणि मला म्हणाले, ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तिक जीवनात तो काय करतो, याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही, असं त्यांनी लिहिलं.