आज सकाळी माध्यमांमध्ये बातमी आली. अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले आहेत. पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून, डोक्याला चार टाके पडल्याची माहिती आहे.
आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 11, 2023
बच्चू कडू यांच्या या अपघातानंतर राज्यात आमदारांच्या होणाऱ्या अपघाताची चर्चा सुरु आहे. काही महिन्यापूर्वी आमदार विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. रस्ते सुरक्षा, वाहनांची गुणवत्ता यावर चर्चा झाली. पण प्रश्न तसाच आहे.
मागील काही दिवसात राज्यातील अनेक आमदारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. याची मोठी यादी बनेल. मागील काही दिवसात नक्की कोण कोणत्या आमदारांचे अपघात झाले हेच आपण पाहूया
मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023
डॉक्टरांनी धनंजय मुंडे यांची पूर्णपणे तपासणी केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या दोन बरगड्यांना फ्रॅक्चर झालं आहे.
माण तालुक्याचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण शहरानजीक भीषण अपघात झाला होता. फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी ५० फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर ४ जण जखमी झाले होते. गोरे यांच्या बरगड्यांना मार बसला होता, तर पायालाही गंभीर दुखापत झाली होती. २४ डिसेंबरला ही घटना घडली होती.
— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) December 24, 2022
काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि जेष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला होता. योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये ६ जानेवारीला अपघात झाला. खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला टँकरने धडक दिली होती. योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली होती. यावर रामदास कदम यांनी घातपाताची शक्यताही वर्तवली होती कारण कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने धडक दिली होती.
मुंबई-पुणे एक्प्रेस हायवेवर रसायनीजवळ 17 मे 2022 रोजी संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.
आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. पण कारमधील एअरबॅग उघडल्या आणि सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
काही महिन्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचाही अपघात झाला होता. सोलापूर पुणे महामार्गावरली वरवंड येथे हा अपघात झाला होता. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला होता.
हायवेवर कंन्टेनर चालकाने पाठीमागून येणा-या वाहनांना कोणताही इशारा न देता त्याची लेन सोडून कंन्टेनर धोकादायकरित्या अचानक उजव्या बाजूच्या मार्गिकेवर घेतल्याने सावंत यांच्या कारगाडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसून हा अपघात झाला होता.
काही महिन्यापूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरून कारमधून मुंबईच्या दिशेनं येत असतानाच पहाटे साडे पाच वाजता विनायक मेटे यांच्या कारचा माडप बोगद्यात भीषण अपघात झाला. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
विनायक मेटे यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या भीषण दुर्घटनेत विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही जबर मार लागला. अपघातानंतर विनायक मेटे यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला, मानेला आणि पायाला जबर मार लागला होता. उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.
आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात रस्ते अपघाताची मोठी चर्चा झाली होती. पण उपाययोजना काय केल्या गेल्या ? हा प्रश्न आहेच. पण मागच्या काही दिवसात लोकप्रतिनिधीचे होणारे अपघात पाहता तरी उपाययोजना करण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवीत. एवढीच माफक अपेक्षा…