मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं 195 उमेदवांरांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव या यातीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु, नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातील जागा वाटपांबाबतचा तिढा सोडवण्यात आला असून, पंकजा मुंडे, नितीन गडकरींची नावे पुन्हा एकदा रेसमध्ये आली आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लोकसभेत भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचेही सांगितले जात असून, गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजप महिला उमेदवारांना जास्त संधी देऊ शकते अशीही माहिती समोर येत आहे.
गडकरी, पंकजांसह अनेकांना संधी
आगामी लोकसभेच्या जागा वाटपासाठी मुंबईत खलबतं झाल्यानंतर राजधानी दिल्लीतही जोरदार खलबतं झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीदरम्यान भाजप 32, शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 4 जागा देण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.या जागावाटपाच्या चर्चेनंतर आता भाजपच्या महाराष्ट्रीतील यादीत केंद्रीय मंत्री नितील गडकरी, पंकजा मुंडे पियुष गोयल यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचेही नाव असून,बावनकुळेंना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी केली जात आहे. या चार ज्येष्ठ नेत्यांसह पक्षाकडून 10 ते 12 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
विधानसभेत आम्ही तुम्हाला सन्मान देऊ; शाहंचा शब्द
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लोकसभेत तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि विधानसभेत भाजप तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि सन्मान देईल असा शब्द दिल्याचेही सांगितले जात आहे. जळगाव जाहीर कार्यक्रमातून शाहंनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही परिवारवादावरून निशाणा साधला होता.