Download App

तेजसचं राजकीय लाँचिंग जोरावर; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे कुठे गायब?

  • Written By: Last Updated:

मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा किंवा जाणवणारी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) अनुपस्थिती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या मौसमात ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे नेमके कुठे गायब झाले या प्रश्नानं सर्वांच्या मनात काहूर माजवलं आहे. तर, दुसरीकडे कोल्हापूर येथे आदित्य ठाकरेंऐवजी तेजस ठाकरेंनी हजेरी लावल्याने ही येत्या काळात तेजसच्या राजकारणातील एन्ट्रीची रंगीत तालीम तर नव्हती ना असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. (Aditya Thackeray Missing From Party Political Event)

मुहूर्त ठरला! फडणवीस, शिंदे अन् अजितदादांचा ग्रीन सिग्नल; 26 मार्चला आढळराव हाती ‘घड्याळ’ बांधणार

सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे आदित्य गेले कुठे?

लोकसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी आणि जनतेच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. यात प्रामुख्याने बोलायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वी कोकणात झालेल्या खळा बैठका, विदर्भ आणि मराठवाड्यासह प्रमुख भागांमध्ये पार पडलेले जनसंवाद मेळावे असो किंवा नुकतीच 21 मार्च रोजी झालेली कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची भेटीवरून लक्षात येत आहे. मात्र, या सर्व ठिकाणी झालेल्या बैठका, मेळावे किंवा भेटीगाठींमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत सत्ताधाऱ्यांवर अक्षरक्षः तुटून पडणारे आदित्य ठाकरे कुठेच दिसले नाही. तर, छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर भेटीदरम्यान आदित्य ऐवजी ठाकरेंसोबत त्यांचे मोठे चिरंजीव तेजस ठाकरे दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, लोकसभेच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठीची ही रंगीत तालीम तर नाही ना असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीनं दिलं आयतं कोलित

एकीकडे लोकसभेसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, निवडणुकांच्या तोंडावर ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. ही मोठी घडामोड घडत असतानाच आदित्य ठाकरे गायब झाल्याने सत्ताधाऱ्यांना टीका करण्यास आयतं कोलित मिळालं आहे. आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ही संधी साधत एक फोटो ट्विट केला आहे.

म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट केजरीवाल आणि अन्य नेत्यांसह असलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळ्यात महाराष्ट्रातला पप्पू पण अडकणार का ??? असा प्रश्न विचारला आहे. एवढेच नव्हे तर, सध्या घोटाळेबाज घाबरुन काही दिवसांपासून फरार असून, मद्य घोटाळ्यातील आरोपी मनिष सिसोदीया आणि के कविता यांना सतत कोण भेटत होतं ?? दिल्लीत कुणाचे पाय पकडायला गेला होतात ??? असे सवाल उपस्थित करत कसं आहे ना …सत्य फार काळ लपून राहत नाही …असे सूचक विधान केले आहे.

महाराष्ट्राचा पप्पू पुन्हा परदेशवारीवर?

एकीकडे जनतेच्या प्रश्नांचा कळवळा दाखवायचा…खोटी खोटी आरडाओरड करायची…मग… रडारड करुन, शिवतीर्थावरच्या सभेनंतर आदूबाळ मात्र गायब…असे म्हणत पेंग्विन पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी गेलाय का??? असं डिवचणारं ट्विट म्हात्रे यांनी केले आहे.

पडद्यामागून आदित्य ठाकरे अॅक्टिव्ह

एकीकडे प्रमुख मेळावे आणि भेटीगाठींदरम्यान आदित्य ठाकरे अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे जरी मुख्य मंचांवरून आदित्य ठाकरे गायब झालेले असले तरी, पडद्यामागून आदित्य ठाकरे अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. एक्सवर आदित्य यांनी केजरीवाल यांच्या अटकेसह अन्य कारवायांव भाष्य करणारी पोस्ट केली आहे. तसेच काही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे परदेशात फिरायला गेल्याचेही बोलले जात आहे.

follow us