Download App

पाटील, सावंत, सत्तार, भुमरे अन् राठोडांना डच्चू? भाजपाच्या अहवालाने खळबळ!

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. हा विस्तार 19 जूनआधी होईल असे सांगण्यात येत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे याचे नियोजन सुरू असतानाच शिंदे गटासमोर मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे. भाजपच्या हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल तर दिलाय पण, त्याचबरोबर नकारात्मक शेरे असलेले शिंदे गटातील पाच मंत्र्यांना वगळण्यासही सांगितले आहे.

शिंदेने केलेल्या मोठ्या बंडात या मंत्र्यांनी त्यांना साथ दिली होती. आता त्यांना वगळायचे कसे, असा प्रश्न शिंदेंसमोर आला आहे. यावर अद्याप कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की या पाच मंत्र्यांत आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

BJP च्या अहवालातील आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाकारले; डॉ. सावंत म्हणाले, माझ्यावरचे आरोप खोटे

तसे पाहिले तर या नेत्यांची राजकीय ताकद मोठी आहे. बंडाच्या काळात हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. संकटाच्या काळात शिंदेंना त्यांची मोठी मदत झाली होती. आता फक्त भाजपचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या विरोधात गेले म्हणून त्यांना सरळ डच्चू द्यायचा, हे धाडस शिंदे दाखवतील याची शक्यता कमी वाटते. जर असा निर्णय घेतला गेलाच तर हे पाच जण उद्धव ठाकरे यांच्या गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोडले तर बाकीचे चार मंत्री आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मंत्री होते. आता त्यांना डावलण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली आहे. त्यामुळे शिंदे मोठ्या राजकीय संकटात अडकले आहेत. असे झाले तर भाजप नामानिराळा राहिल पण शिंदे गटात मोठी फूट पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शिंदे यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचे दिसत आहे.

कर्जत बाजार समितीच्या सभापतीची आज निवड, रोहित पवारांकडे की राम शिंदेंकडे जाणार सत्ता?

 

अहवालात काय?

राज्यातील मंत्र्यांच्य कामकाजावर भाजपाची एक यंत्रणा सतत लक्ष ठेवून असते. या यंत्रणेमार्फतच भाजप हायकमांडकडे अहवाल पाठविला जातो. या अहवालामध्ये राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नकारात्मक उल्लेख आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना या पाच मंत्र्यांना वगळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आता यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरच या पाच मंत्र्यांना वगळणार का, वगळले त्यांच्या जागी कुणाला मंत्रिपद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us