Download App

NDA किती जागा जिंकणार, लोकसभेत महाराष्ट्रात काय होणार? शिंदेंनी थेट आकडाच सांगितला

Eknath Shinde : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची मोठी बैठक बंगळुरूत पार पडली. विरोधकांच्या या राजकारणाला भाजपानेही तशीच मोठी बैठक आयोजित करून उत्तर दिले. काल राजधानी दिल्लीत एनडीएची मोठी बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नुकतेच सरकारमध्ये दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले.

बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसामाध्यमांशी संवाद साधत मोठा खुलासा केला. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार 45 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल. त्यामुळे केंद्र सरकारला राज्यातून मोठे पाठबळ मिळेल. महाराष्ट्र नेहमीच मोदींच्या पाठिशी ठाम उभा राहिला आहे. यावेळीही तसेच घडेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

देशभरात एनडीएला 330 जागा मिळू शकतात. इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी आहे. विरोधकांना त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता आला नाही. एक नेता ते ठरवू शकले नाहीत असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांच्या बैठकीची खिल्ली उडविली.

दरम्यान, काल बंगळुरूत विरोधी पक्षांची बैठक झाल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वात दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांना महत्वाचे स्थान देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष नड्डा यांच्यामध्ये बसले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत होते. कालच्या या बैठकीपेक्षा या प्रसंगाचीच जास्त चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती.

Tags

follow us