Download App

Maharashtra Congress : प्रदेशाध्यक्ष नेहमीच वरचढ बनण्याच्या प्रयत्नात…पण ऐनवेळी बाजी पलटते !

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. कधीकाळी राज्यात नंबर एकचा पक्ष असलेला व आता चार नंबरवर असलेल्या काँग्रेसमधील थोरात व पटोले यांच्यातील वाद आता टोकाला गेला हे नक्की.
तस पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष आणि सत्ताधारी म्हणजे मुख्यमंत्री यांच्यात वाद काही नवीन आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष (Congress State President) आणि मुख्यमंत्री हा वाद कायम पाहायला मिळाला. कारण मुख्यमंत्री गटाचे वर्चस्व कायम राहू नये, अथवा प्रदेशाध्यक्षाचा निरंकुश राहू नये. हा मागचा हेतू सर्वच दिल्लीश्वरांचा राहिला आहे. दोन नेत्यांमधील वादातून पक्षाची अंतर्गत माहिती मिळावी हा देखील उद्देश या मागे नक्की राहिला आहे. हे वाद पक्षात बऱ्याचदा अंतर्गत राहिला. पण काही वेळा उफाळून बाहेर आला आणि चांगलाच गाजला आहे. अनेकदा तर मुख्यमंत्री यांना पायउतार व्हावं लागलं अथवा प्रदेश अध्यक्ष बदलले गेले आहेत. काँग्रेसमध्ये काही वाद चांगलेच गाजले आहेत.

वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील यांच्यात संघर्ष

आपण वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाचे चित्र पाहू या. वसंतदादा पाटील दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. खरंतर राज्याच्या अनुभवी नेत्या होत्या. अस असलं तरी दिल्लीच्या नेत्यांच्या म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या खास अशीच त्यांची ओळख होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी काँग्रेस अध्यक्ष तसेच पंतप्रधान असा दोन्ही पदावर आले. त्यांनी प्रतिभाताई यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमलं. ही नेमणूक वसंतदादा यांच्यां खूप जिव्हारी लागली. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनेक विंनती करूनही दादांनी पुन्हा कुठलंही पद घेतल नाही.

प्रतिभाताई व पवारांमध्ये संघर्ष

पुढे प्रतिभाताई आणि शरद पवार यांच्यातील वाद अनेकदा समोर आले. परंतु पेल्यातील वादळ पेल्यात राहिले आहे.
शरद पवार यांचा खरा वाद एम. एम. कांबळे हे प्रदेश अध्यक्ष असताना रंगला होता. कांबळे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांनी एकत्र येऊन पवारांविरोधात आघाडी उघडली होती. पण पवार या सर्वांना पुरून उरले होते. यावेळी कांबळे यांच्या नेतृत्वात विलासराव, सुशीलकुमार आणखी एका नेत्याने बंड पुकारले आहे. यावेळी पक्षात फूट पडते की काय ? अस चित्र निर्माण झालं होत. यावेळी पवार यांनी दिल्लीत फिक्सिंग लावून कांबळे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केलं.


रणजित देशमुख अध्यक्षपदावरून पायउतार

यानंतरही पक्षात प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री वाद होत राहिले. विलासराव देशमुख, तसेच सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना रणजितबाबू देशमुख यांच्यात मोठे वाद पाहायला मिळाले. रणजितबाबू यांचं विदर्भात मोठ प्रस्थ होते. त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. पक्षात नेमणुका करणे, लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मुद्यावर रणजित बाबू यांच्यावर कायम संघर्ष पाहायला मिळाला आहे. सुशीलकुमार शिंदे यांची दिल्लीतील सलगी होतीच. पण शरद पवार यांच्याशी असलेले मैत्री यावर रणजित बाबू यांनी चांगलाच प्रहार केला. यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यात काँग्रेसला विदर्भात मोठा फटाका बसला. पक्षाने रणजित देशमुख यांना प्रदेश अध्यक्षपदावरून पाय उतार केलं. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असेल तरी शरद पवार सरकारचं रिमोट कंट्रोल आहेत असा थेट अहवाल रणजितबाबू यांनी दिल्लीला अहवाल दिला. तसे तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली. पण सुशीलकुमार देखील बदलले गेले. एकाच वेळी विलासराव देशमुख यांचे दोन्ही स्पर्धक म्हणजे रणजितबाबू आणि सुशीलकुमार मुख्यमंत्री स्पर्धेतून बाद झाले.

गोविंदराव आदिकांनी विलासरावांचे मुख्यमंत्रीपद घालवले

गोविंदराव आदिक हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीही विलासरावांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. गोविंदरावांनी 2003 मध्ये विलासराव यांचे मुख्यमंत्रीपद घालविण्यात मोठीच भूमिका पार पाडली. त्यांना आपण मुख्यमंत्री होऊ असे वाटत होते. पण ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अदिक हे कृषी, विधी व न्याय खात्याचे मंत्री झाले

प्रभा राव यांनी विलासरावांना जेरीस आणलं
विलासराव हे राज्यात पकड निर्माण करतील, अस चित्र असताना दिल्लीकरांनी प्रभाराव याची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्यावेळी मार्गारेट अल्वा या पक्षाच्या प्रदेश प्रभारी होत्या. राव यांचं दिल्ली कनेक्शन , अल्वा यांच्या सोबत असलेली मैत्री यातून प्रभा राव यांनी प्रदेशाध्यक्षपद गाजवलं नव्हे तर विलासराव देशमुखांना जेरीस आणलं. भांडणात ना विलासराव यांनी राजीनामा दिला ना राव यांनी राजीनामा दिला. पण दोघांच्या भांडणात कधी विलासराव पायउतार होतील, कधी प्रभा राव दिल्लीला जातील असा वावड्या कायम उठत राहिल्या, पण मुरबी विलासराव यांनी मुख्यमंत्रीपद ही सांभाळलं आणि प्रभा राव यांना देखील सांभाळलं.

विलासराव मुंबई हल्ल्यानंतर पायउतार झाले, ते केंद्रात मंत्री झाले प्रभा राव या देखील दिल्लीला परत गेल्या.
या नंतर माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण ही जोडीही होती पण नेमणुका व्यतिरिक्त अधिक संघर्ष झाला नाही. सोनियांच्या सभेच्या वेळी गर्दीसाठी बसेस आण, हा मुद्दा गाजला पण तो पक्षांतर्गत होता. तो पत्रकार परिषदेत माईक चालू राहिल्याने समोर आला. पण अशोक चव्हाण यांनी तो खेळाडूवृत्तीने घेतला.माणिकराव यांचा खरा वाद रंगला तो पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी, चव्हाण बहुतांश काळ दिल्लीकर म्हणून वावरले, महाराष्ट्रामध्ये थेट मुख्यमंत्री झाले. पक्ष संघटना माणिकराव ठाकरे यांच्या हातात होती. पक्ष चालवायचा असेल तर कार्यकर्ते आणि आमदार यांची काम झाली पाहिजे. हा माणिकराव यांचा कायम आग्रह राहिला.त्याचबरोबर निवडणुकांना पैसा लागतो ही बाब देखील होतीच.

पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरेंना पुरुन उरले
पृथ्वीराज बाबा यांनी स्वच्छ प्रशासन च्या नावाखाली अनेकांची काम रेंगाळत ठेवली. माणिकराव यांच्या पाठीशी आमदार एकत्र आले. आणि पृथ्वीराज बाबाविरोधात आघाडी उभारली, त्यावेळी राणे हे देखील माणिकराव यांच्या बाजूने होते. राष्ट्रवादीची देखील माणिकराव ठाकरे यांना साथ असल्याचे बोलल जात होता. पण या सर्वच गोष्टीना पृथ्वीराज चव्हाण पुरून उरले.

Thorat Vs Patole: थोरातांकडून वाढदिवसाच्या दिवशीच नाना पटोलेंना ‘रिटर्न गिफ्ट’

आता पटोले थोरातांचा संघर्ष
आता नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सामना रंगला आहे. शांत संयमी थोरात आणि तडकाफडकी नाना हे कॉम्बिनेशन जमणार नाही हे सर्वश्रुत आहे. झालं ही तसंच. अतिशय प्रतिकूल म्हणजेच मोदीच्या लाटेत थोरात यांनी राष्ट्रवादीच्या सोबत जुळवून घेतलं. काँग्रेसच्या ४२ जागा आणल्या. राष्ट्रवादी आणि थोरात हे कॉम्बिनेशन जुळत असताना पक्षाने प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पाटोले यांना पुढे आणलं. पक्षात वाद सुरू झाले. नाना पटोले यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून लॉबिंग केली गेली. नाना देखील आधी महसूलनंतर नितीन राऊत यांचे ऊर्जा मंत्रिपद हवे होते. पण ते नानांना मिळू शकले नाही. पुढे थोरात, वडट्टीवर, राऊत, सुनील केदार एकत्र झाले. नानांविरोधात आघाडी उघडली. अशोक चव्हाण गटाने नानाशी जुळवून घेतल्याच्या चर्चा रंगल्या. या वादातून तांबे प्रकरण घडले आहे. नाना पटोले यांनी थेट नगर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केली. हा थोरात यांना झटका नव्हे तर एक प्रकारे अपमान होता. यातून थोरात यांनी राजीनामा दिला.

Tags

follow us