Download App

‘बागेश्वर बाबावर मंत्री विखे भडकले.. म्हणाले, बाबाचे वक्तव्य निव्वळ थोतांड, अशा लोकांवर..

बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेतेही टीका करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) यांनी बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, ‘धर्माचा काय प्रचार करायचा तो जरुर करा परंतु, दुसऱ्याचा अवमान करण्‍याचा आधिकार तुम्‍हाला नाही.’

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

‘धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींकडून याआधीही अशी वादग्रस्‍त वक्तव्ये झाली आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्‍हान स्वीकारायला ते तयार नाहीत याकडे लक्ष वेधून साईबाबांबद्दल अशा पध्‍दतीची नेहमीच वादग्रस्‍त विधानं करुन बुद्धिभेद निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. यामुळे धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण होते. अशा बाबा लोकांची वक्‍तव्‍य ही केवळ सवंग लोकप्रियतेचे एक थोतांड आहे.’

‘साईबाबांनी आपल्‍या संपूर्ण वाटचालीत माणसांमध्‍ये देव पाहिला. म्‍हणूनच साईबाबांचे ‘सबका मालिक एक’ असे आपण म्‍हणतो. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र त्‍यांनी विश्‍वाला दिला. त्‍या आधारेच आज संपूर्ण विश्‍वाची वाटचाल सुरू आहे. लाखो भक्‍तांचे ते श्रद्धास्‍थान आहे. कुणाच्‍या श्रद्धेवर चिखलफेक करण्‍याचा कोणालाही आधिकार नाही.’

भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना केले लक्ष्य, रोहित पवारांचा आरोप

‘महाराष्‍ट्र संताची भूमी आहे. संतानीच हा समाज उभा करण्‍याचे काम केले. त्‍यांच्‍यामध्‍येच आम्‍ही देव बघतो. परंतु या संतांप्रती असणाऱ्या श्रध्‍देला कोणी अवमानित करत असेल तर ते कदापि आम्‍ही सहन करणार नाही. धर्माचा काय प्रचार करायचा तो करा. मात्र, दुसऱ्याचा अवमान करण्‍याचा आधिकार तुम्‍हाला नाही’, अशी जोरदार टीका मंत्री विखे यांनी केली.

‘बाबा लोक स्वतः देवाचे रुप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. हे धार्मिक तेढ निर्माण करत अशांतता पसरविण्याचे काम करतात.’

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बागेश्वर बाबासह राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले,  ‘कालिचरण महात्मा गांधींना काय वाटेल ते बोलतो.. बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे त्यांना राग येत नाही.. सरकार नपुंसक, कोणीही या काहीही बोला कुणालाही बोला सरकार काही करणार नाही, जाहीर आमंत्रण..’

Tags

follow us