Download App

‘बुजुर्ग काकांचा पक्ष हिसकावणं सोप्पं आहे पण’.. ‘मनसे’नेही अजितदादांना सुनावलं

Raj Thackeray on NCP : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर ट्विट करत मनसेने (MNS) अजित पवारांना टोला लगावला आहे.

मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे, की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते.. असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!

या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. मी त्यांचे, सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Eknath Shinde : मेरिटच्या आधारेच पक्ष अन् चिन्हाचा निर्णय; CM शिंदेंच्या अजितदादांना शुभेच्छा

follow us