Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे लावला जात आहे. अशा परस्थितीत एकेकट्या लढणाऱ्या पक्षातील प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही असा नाराजीचा सूर त्यांच्या या ट्विटमध्ये दिसतो. परंतु, नेमकं आताच अन् तेही निवडणुकीच्या धामधुमीत रोहित पवारांना असं वक्तव्य का करावं लागलं, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करू या..
#जन_की_बात ऐकली तर #चायना_गॅरंटी देणाऱ्या भाजपबाबत लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं. पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितकं आक्रमक का होत नाही? एकेकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना 'दुसऱ्या' फळीतील नेत्यांनीही खंबीर साथ देऊन विरोधाची धार अधिक तीक्ष्ण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 15, 2024
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा अजून शरद पवार गटात प्रवेश झालेला नाही. मध्यंतरी त्यांनी पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. पक्षाचं चिन्ह तुतारीही हातात घेतली. यावेळी रोहित पवार मात्र तिथं हजर नव्हते. अजून लंकेंच्या अधिकृत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण या घडामोडींवरूनच पक्षात धुसफूस वाढल्याचं समोर येत आहे. राजकीय वर्तुळात तशी चर्चाही आहे. निलेश लंकेंना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. याचं श्रेय त्यांनाच दिलं जात आहे. यावरून रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.
यातच आता रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, जन की बात ऐकली तर चायना गॅरंटी देणाऱ्या भाजपाबाबत लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं. पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितकं आक्रमक का होत नाही? एकेकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही खंबीर साथ देऊन विरोधाची धार आधिक तीक्ष्ण करण्याची गरज आहे.
Rohit Pawar : ‘तिकीट’ संकटात म्हणून दिल्ली दौरे वाढले का? रोहित पवारांचा विखेंना खोचक सवाल
काही ठराविक नेते आणि कार्यकर्ते हेच महाशक्तीला अंगावर घेत जातील पण काही नेते मात्र व्यक्तिगत अॅडजस्टमेंट करतील किंवा द्विधा मनस्थितीत असतील तर महाराष्ट्र धर्माचं आणि सामान्य माणसाचं मोठं नुकसान होईल, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. नगर दक्षिण लोकसभेतील महायुतीचा उमेदवार ठरला आहे. मात्र महाविकास आघाडीचं अजून ठरत नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असले हे अद्याप समोर आलेलं नाही. याच लोकसभा मतदारसंघात रोहित पवार प्रतिनिधीत्व करत असलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे. अशा परिस्थितीत एकूणच नगर दक्षिण मतदारसंघात शरद पवार गटाची राजकीय ताकद कमी झालेली असतानाच रोहित पवारांची नाराजीने नेमका कुणाला आणि का संदेश दिला याचं उत्तरही मिळेल.