Ambadas Danve on Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घटना ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यानंतर राज्यात शिवधनुष्य यात्राही काढली जाणार आहे. आगामी निवडणुकांसाठी ही प्लॅनिंग असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधकही सतर्क झाले असून टीकाटिप्पणीस सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी कठोर शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
‘अयोध्या दौरा फक्त दिखावा असून, रामाचे विचार यांनी कधीच झेपणार नाही’, असे दानवे म्हणाले.
जो धनुष्यबाण त्यांना भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कृपेने मिळाला आहे. जो धनुष्यबाण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देव्हाऱ्यातून चोरला आहे. तो धनुष्यबाण यांच्या हाती कधीच शोभणार नाही. हा धनुष्यबाण कधी रामाचा होऊ शकत नाही, श्रीकृष्णाचा होऊ शकत नाही. हा धनुष्यबाण रावणाचाच आहे. हा जनतेचे कधीच कल्याण करू शकत नाही.
राम मंदिर व्हावं म्हणून पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी दिली होती. पण आता न्यायालयाने निकाल दिला. राम मंदिर होत आहे. अशा वेळी अयोध्येला जाणे मर्दुमकी आहे. हा तर फक्त दिखावा आहे. ही रावणी प्रवृत्ती आहे, अशा जळजळीत शब्दांत आ. दानवे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे रविवारी अयोध्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यांंच्या या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दौरा शिंदेचा असला तरी भाजप यामध्ये कमालीचा सक्रिय दिसत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर भाजप नेत्यांची एक विशेष टीमही असणार आहे. ही टीम येथे घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे समजते.
शिंदे गटाचे पदाधिकारीही यामध्ये सहभागी आहेत. दौऱ्याची जबाबदारी शिंदे गटाच्या नाशिक येथील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्ते रवाना होत आहेत.