Download App

विरोधी पक्षनेत्यासाठी ‘मविआ’चा खास फॉर्म्युला; शरद पवारांचा शब्द चालणार?

तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे. 

प्रशांत गोडसे, मुंबई 

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. विरोधी पक्षनेता पद मिळेल इतक्याही जागा आघाडीतील घटकपक्षांना निवडून आणता आल्या नाहीत. ठाकरे गटाला फक्त वीस जागा मिळाल्या. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत या जागा जास्त आहेत. आता राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाविकास आघाडीत मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी वेगळा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते भेटणार आहेत. येथेही या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यानंतर या अधिवेशना दरम्यानच विरोधी पक्षनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ठरलं तर! विधानसभेत ठाकरेंचा तर विधानपरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता; बैठकीत निर्णय

मविआच्या बैठकीत खलबतं

मंगळवारी महाविकास आघाडीची एक बैठक झाली होती. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला. शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यालयात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे अनिल परब, सुनील प्रभू, शरद पवार गटाचे जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान आदी उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाली. काही नावे समोर आली आहेत. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मागील वेळी हे पद काँग्रेसकडे होतं.  परंतु, यंदा काँग्रेसपेक्षा ठाकरे गटाचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या पदावर त्यांचा दावा अधिक बळकट असल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षात आणखी फूट पडणार? राजकीय भूकंपाच्या दाव्यावर पवारांचा फुलस्टॉप!

महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांबाबत निर्णय झाला नव्हता. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाआधी महाविकास आघाडीकडून याबाबत लवकरच  निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पद कोणत्या पक्षाला द्यायचं हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या पदांवर कोणत्या नेत्याला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पटोलेंना नकोय प्रदेशाध्यक्षपद, या नावांची चर्चा

दरम्यान, काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीत झालेला पराभव पाहता विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध असंतोष वाढला आहे. त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. यातच आता नाना पटोले यांनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस हायकमांडकडून सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरू आहे. अमित देशमुख आणि सतेज पाटील अशा दोन नावांची चर्चा आहे.

follow us