Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने (Lok Sabha Election 2024) राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. दुसरीकडे गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधकांच्या हल्लाबोलाने सरकारही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोक सदरातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचे राज्य सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत. गुंड राज्यकर्त्यांना खुलेपणाने भेटू शकतात त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास वाढतोय. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या गुंडाने गोळ्या झाडल्या आणि हत्या केली. बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली. पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात पण, महाराष्ट्रासारख्या राज्यात सुरू असलेले गुंडारा गंभीर वाटत नाही का? असा सवाल उपस्थित करत मोदींनी आता केदारनाथच्या गुहेत जाऊन तपश्चर्या आणि आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असा टोला लगावला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला. आयोगाच्या या निकालावर संजय राऊत यांनीही आयोग आणि मोदी-शाहांवर घणाघाती टीका केली होती. राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेसारखाच लागला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ते स्वतः आयोगासमोर येऊन बसले. तरीही आयोग पक्ष एका आयाराम गयाराम, ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देतो. इतिहासात असा अन्याय कधी झाला नसेल. पक्षाचे संस्थापक समोर असताना जर आयोग संपूर्ण पक्षच एखाद्याच्या हातात सोपवत असेल कर यालाच मोदी गॅरंटी म्हणतात, असा खोचक टोला राऊतांनी लगावला होता.