Jayant Patil reaction on Pankaja Munde’s Statement : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला जोरदार टोले लगावले.
जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर पाटील म्हणाले, भाजपचा अलीकडे हाच प्रॉब्लेम झाला आहे की अनेक लोक राष्ट्रवादीतून गेलेत. त्यामुळे पक्षाचे जे खरे निष्ठावंत आहेत त्यांना कुठं बसवायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तरी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातून भाजपात जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत. ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे.
दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
दिल्लीतील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. सरकार एका बाजूला संसदेचे उद्घाटन करते तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतील पहिलवानांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते. संसद भवनाचे उद्घाटन सुरू असताना आंदोलन चिरडलं तर मीडिया दाखवणार नाही यासाठी हा खटाटोप केला. पण जनता त्यांच्या पाठीशी राहिली. भाजपनं स्वतःहून या कार्यक्रमाला गालबोट लावून घेतलं, असे पाटील म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?
तुम्ही म्हणताय ताईची पार्टी, ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पार्टी माझी होऊ शकत नाही. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखी काय होईल ? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही मुंडे म्हणाल्या.
दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल