Sushma Andhare : नागालँडमध्ये निवडणुकीनंतर (Nagaland Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या अचंबित करणाऱ्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयाचे समर्थन करताना राष्ट्रवादीच्या आमदारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच (RSS) आव्हान दिले आहे.
अंधारे म्हणाल्या, की ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागालँड सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपचे हिंदुत्व धोक्यात आले आहे. जसे ते महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोबत गेल्यावर शिवसेनेचे हिंदुत्व धोक्यात येते तसेच ते आता नागालँडमध्ये भाजपचे धोक्यात आले असेलच.’
हे वाचा :Sushama Andhare : रामदास कदमांचं बोलणं म्हणजे, अंधारेंनी लगावला टोला
‘तेव्हा बीजेपीने आता नागालँड सरकारचा पाठिंबा मागे घेऊन आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध केलं पाहिजे. तसं केलं नाही तर बीजेपी आरएसएसचे तथाकथित हिंदुत्व नकली असल्याचे सिद्ध होईल’ असे अंधारे म्हणाल्या.
चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? सुषमा अंधारेंचा सवाल
दरम्यान, याआधी आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला समर्थन दिले असे म्हणता येणार नाही. या मुद्द्यावर पक्षप्रमुख शरद पवार यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मी आधिक बोलणे योग्य होणार नाही, असे आ. पवार यांनी सांगितले. नागालँडच्या निवडणुकीचा अभ्यास करण्यापेक्षा महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत पक्षप्रमुख शरद पवार काय राजकीय समीकरण घडवून आणतील याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.