Maharashtra Vidhan Parishad Election 2026: गेल्या महिन्यातील राज्यसभा आणि आताच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत (Maharashtra Vidhan Parishad Election 202) द्वंद पाहिला मिळाले. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीत दोन्ही निवडणुकीत वाद उफाळून आला. ही विधानपरिषदेची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सोडली आहे. पण या जागेच्या आडून काँग्रेसने (Congress) मोठा डाव टाकला आहे. भविष्यात रिक्त होणारी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी अट घातली होती. ही अट ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मान्य केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ठाकरेंची फायरब्रँड प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भविष्यातील राजकीय वाटचाल संकटात आलीय.
Congress : उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात?
महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ हे 46 आहेत. त्यात ठाकरेसेनेकडून सर्वाधिक वीस आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे दहा आमदार आहेत. त्यामुळे विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एखादा उमेदवार निवडून जातो. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्येच वाद उफाळून येतो. गेल्या दोन निवडणुकीत हे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात राज्यसभा निवडणूक झाली. त्यात महाराष्ट्रातून सात जण राज्यसभेवर पाठवायचे होते. यातील एक जागा महाविकास आघाडीला मिळाली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला होता. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती. संजय राऊतांनी शरद पवार हेच राज्यसभेवर हवे आहेत, असे सांगून पाठिंबा दर्शविला. त्याला काँग्रेसने विरोध दर्शविला होता.
हा वाद थेट दिल्लीत गेला होता. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर गेले आहेत.
विधानपरिषदेच्या आडून शब्द घेतला
विधानसभा सदस्यातून महाविकास आघाडी केवळ एक जण विधानपरिषद पाठवू शकणार होता. ही जागा ठाकरेसेनेला सोडण्याचा निर्णय झाला. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस हे उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही होती. काँग्रेसनेही उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असेल, तर त्यांना आमचा पाठिंबा अन्यथा काँग्रेस उमेदवार देईल, असे जाहीर केले. पण झालं उलटच उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले. तोपर्यंत सर्वजण ठाकरेच विधानपरिषदेवर असतील असे पक्के केले. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेत राष्ट्रवादीत खळबळ उडाली. शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अनिल परब, ठाकरेंचे खास मिलिंद नार्वेकर यांची आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषद सोडल्यानंतर आगामी राज्यसभेची जागा काँग्रेसने मागितली आहे. राष्ट्रवादी व ठाकरे सेनेच्या नेत्यांनी या जागेसाठी शब्द दिलाचे बोलले जात आहे.
संजय राऊतांचा पत्ता कट होणार ?
2022 मध्ये महाराष्ट्रातून भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तिघे राज्यसभेवर गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी हे राज्यसभेवर गेले होती. हे सदस्य 2028 ला सभागृहातून निवृत्त होणार आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता तेव्हाही एकच जण राज्यसभेवर जाईल. तेव्हा काँग्रेस ही जागा सेनेला सोडणार नाही. कारण त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत शब्द घेतल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे संजय राऊतांचा राज्यसभेचा पत्ता कट होईल, असे बोलले जात आहे.
