Manoj Jarange Patil’s ultimatum to the government : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून वारंवार चर्चा आणि आश्वासनं दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. सरकार आणि शिष्टमंडळाने गैरसमजातून बाहेर पडावे, आता आम्ही सरकारला वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
… नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा कुणाला ?
शिष्टमंडळाच्या चर्चेवरही जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “किती दिवस चर्चा करणार आहेत? सरकार चर्चा करतं आणि चर्चेचा अवमानही करतं. तुम्हाला अजून मराठा समाजाकडून अपेक्षित काय आहे?” असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाच्या नोंदी देणे हे सरकारचे कर्तव्य असून, तब्बल 58 लाख नोंदी देण्यात आल्या आहेत. मराठ्यांना वेड्यात काढता येईल, हा सरकारचा गैरसमज असल्याचेही त्यांनी म्हटले.
शिष्टमंडळ सरकारसोबत नेमकी काय चर्चा करणार, असा सवाल करताना त्यांचा उद्देश मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. “मराठ्यांच्या पुढे आता सरकार उघड पडलं आहे. आता त्यांना सुट्टी नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
भुजबळांवर जरांगेंची टोलेबाजी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. सुरुवातीपासून आमची भूमिका स्पष्ट होती, असे सांगत 32 टक्के ओबीसी आरक्षणातून मराठ्यांनी आरक्षण मागितले नाही, असे त्यांनी म्हटले. विनाकारण मराठा समाजाशी वाद करून कोणाचाही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.
Video : वारंवार मागण्या का बदलता अन् उपोषण का करता?, मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं
“बरं झालं, भुजबळ म्हातारपणात शहाणे झाले,” अशी खोचक टिप्पणी करत भुजबळ आता चांगले हसत असल्याचे जरांगे म्हणाले. त्यांना एवढं हसताना महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका’; ओबीसी नेत्यांना आव्हान
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना थेट आव्हान दिले. कोणत्या ओबीसी समाजाचे कल्याण केले, आरक्षणात कोणता मायक्रो ओबीसी मोठा झाला, असा सवाल त्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी नेत्यांच्या दारात फिरण्यापेक्षा ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
माझं ओबीसी नेत्यांना आव्हान आहे, मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या नादाला लागून तुमचं राजकीय करिअर उध्वस्त करू नका. तुम्ही मंत्री, आमदार झाल्यानंतर मराठ्यांच्या विरोधात काम करता. तुम्ही मराठा-कुणबीच्या नादाला लागायचं नाही, अन्यथा तुम्हाला कांड्यावर मोजण्याइतकंसुद्धा ठेवणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
फडणवीस-शिंदेंसह बावनकुळेंवर जरांगेंचा निशाणा; ‘मराठा-ओबीसींमध्ये जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जाते’
सर्व जाती-धर्मातील ओबीसींचा विचार करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय संघर्ष उभा करू नये, असे आवाहन केले. मराठे आणि धनगर यांच्या विरोधात जाऊन राजकारण करणाऱ्यांना त्याचा राजकीय फटका बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारने डाव टाकल्यास मुंबईत जाण्याचा इशारा
आगामी आंदोलनाबाबतही जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सरकारने कोणताही डाव टाकला तर आंदोलन मुंबईत नेण्याचा इशारा त्यांनी दिला.
“वर्षा बंगला आपल्या सगळ्यांचा आहे. फडणवीस विरोध करणार नाहीत. त्यांना खोलीत अडचण होत असेल तर स्लॅबवर बसून आंदोलन करीन,” असे जरांगे यांनी म्हटले.
मराठा समाजाला किती दिवस वेड्यात काढणार, असा सवाल करत नोंदी देऊन मराठा समाजाचा सन्मान करणे हे सरकारचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास सरकारला योग्य उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
‘28 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा’
सरकारकडून मिळणाऱ्या आश्वासनांचा कंटाळा आल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “आश्वासन ऐकून कंटाळा आला आहे. 28 ऑगस्टपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा,” अशी मागणी त्यांनी केली.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात तेल व्यापारी एकवटले; नाशिक बैठकीकडे राज्याचे लक्ष
सरकारने गैरसमजातून बाहेर पडावे आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. आपण प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत असून समाज आपल्याला उघडं पडू देत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी उपोषण करून मरणार
आपला लढा अंतिम टप्प्यात असून मराठा समाज या लढाईत 100 टक्के जिंकेल, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मागण्या मान्य झाल्या तर ठीक; अन्यथा सरकारची “मस्ती उतरवणार” असल्याचा इशारा त्यांनी दिला.
“तुम्ही जी मजा घेतली तीन वर्षं, त्यामुळे तुम्हाला सोडणार नाही,” असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जोपर्यंत आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत मराठा समाज आंदोलनस्थळी येत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हवामान विभागाचा इशारा; राज्यात मेघगर्जना, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता
“या लढाईत मराठे 100 टक्के जिंकणार, अन्यथा मी उपोषण करून मरणार,” अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर अंतिम इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
