तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात तेल व्यापारी एकवटले; नाशिक बैठकीकडे राज्याचे लक्ष
गरीब माणसाला नेहमी मोठे पॅकेट परवडत नाही. अनेकजण गरजेनुसार 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा कमी प्रमाणात तेल खरेदी करतात.
Oil traders unite against Tukaram Mundhe’s action : कोल्हापुरात आयोजित तेली समाजाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील जुगलबंदी चांगलीच चर्चेचा विषय ठरली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक करत राजकीय टोलेबाजीही केली. मात्र या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा झाली ती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवर घातलेल्या निर्बंधांवर विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची.
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेल विक्रीबाबत अलीकडेच कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर निर्बंध आणत पॅकेजबंद खाद्यतेल विक्रीलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र या निर्णयाला तेल व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि तेली समाजाकडून विरोध सुरू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढे यांचे नाव न घेता सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. आता तोच बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला पॅकेटमधले तेल विकण्यास सांगितले जात आहे. मात्र आमच्या समाजाने कधीही भेसळयुक्त तेल विकलेले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
पार्थ पवार झाले सक्रिय, शरद पवारांनी बोलावली कोअर कमिटी; राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय होणार?
ते पुढे म्हणाले, गरीब माणसाला नेहमी मोठे पॅकेट परवडत नाही. अनेकजण गरजेनुसार 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा कमी प्रमाणात तेल खरेदी करतात. अशा वेळी सुट्टे तेलच त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. त्यामुळे या निर्णयाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसणार आहे. सरकारने तातडीने याबाबत पुनर्विचार करून तेली समाजाला आणि पारंपरिक तेल व्यावसायिकांना न्याय द्यावा.
या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुकही केले. त्यानंतर बावनकुळे यांनीही आपल्या खास शैलीत वडेट्टीवारांना राजकीय ऑफर दिली. 2047 पर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही. त्यामुळे विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा सत्तेत या, असे म्हणत बावनकुळेंनी वडेट्टीवारांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र नंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केवळ विनोदाचा भाग असल्याचे स्पष्ट केले.
मी कधी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं; Gen Zच्या प्रश्नावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची महत्त्वाची बैठक पार पडत असून राज्यभरातील व्यापारी या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. पारंपरिक खाद्यतेल व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि कमी उत्पन्न गटातील ग्राहकांवर या निर्णयाचा गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा महासंघाकडून करण्यात येत आहे.
सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवरील निर्बंध कायम ठेवायचे की त्यामध्ये काही बदल करायचे, यावर व्यापारी संघटनांची भूमिका काय राहणार आणि सरकार यासंदर्भात पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे आता तेल व्यापारी, ग्राहक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.