औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे (Dr. Janardhan Waghmare) यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist congress) भवितव्य वर्तविले आहे. तर २०१४ विधानसभा निवडणुकीत आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले विक्रम काळे (Vikram Kale) यांनी एबी फॉर्म न देता फसवणूक केल्याचा आरोप ही वाघमारे यांनी केला आहे.
लातूरचे माजी नगराध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य डॉ. जर्नादन वाघमारे यांना २०१४ मध्ये लातूर शहर विधानसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी लोकाग्रहास्तव घेतला होता. पण वाघमारे यांना पक्षाचा एबी फॉर्मच मिळाला नाही. त्यामुळे ते निवडणूक लढू शकले नाहीत. त्याबाबत वाघमारे म्हणाले, शरद पवार हे बीडमध्ये असताना त्यांचा फोन मला आला होता. त्यांनी निवडणूक लढविण्यास सांगितले होते. डी. एन. शेळके आणि आमदार विक्रम काळे यांना पवार यांनी फोन करण्यास सांगितले होते. त्यावेळी ते माझ्या बाजूला बसलेले होते. विक्रम काळेंशी पवारांचा फोन झाला होता. त्यावेळी काळे यांचा चेहरा पडला होता. माझ्या उमेदवारीसाठी काळे, शेळके यांना पैसे जमा करण्यासाठी सांगितले होते. काही पैसे पवार हे देणार होते. पण काळे यांनी पैसे जमा होऊ शकले नाहीत, असे सांगितले.
काळे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिला नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. वाघमारे म्हणाले, शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा होता. माझ्याकडे एबी फॉर्म नव्हता. त्यासाठी विक्रम काळेंना मी फोन करत होतो. त्यांनी फोन उचलले नव्हते. त्यांनी एबी फॉर्म दुसऱ्याकडे दिला होता. वेळ निघून गेल्यानंतर ते भेटायला आले होते. मी निवडणुकीत उभा राहिलो असते तर निवडून आलो असतो, असा दावाही वाघमारे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या भवितव्यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे भवितव्य अंधारात आहे. हे सगळे काँग्रेसला विकले गेले आहे. राष्ट्रवादीमध्ये स्वाभिमानी माणूस एकही नाही. ही वस्तुस्थिती आहे. काहींना कंत्राट मिळाल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला आहे.