MD Drugs Factory in Satara, Shinde’s connections, trying to suppress the case; Harshvardhan Sapkal alleges : सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरु होता. सावळी गावातील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सावळी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरु होता त्याची कल्पना सातारा पोलीसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधिक्षक आहेत ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस व शिंदे यांनी दिले पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ठरलं! राहुल कलाटे भाजपवासी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, उद्या प्रवेश होण्याची शक्यता
सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा ड्रग्ज प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. १५ तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय २७ तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घिसाडघाईने जाहीर करून निवडणूक आयोगाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न
महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघालेले आहे, पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. न्यायालयाचा निकाल येताच कोकाटे नॉट रिचेबल झाले आहेत. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पार्थ पवार यांना जसे वाचवले तसे कोकाटे यांनाही वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राहुल गांधी व सुनिल केदार या काँग्रेस नेत्यांविरोधात कोर्टाचा निकाल येताच २४ तासाच्या आत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती पण कोकाटे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचवले जात आहे, ही लोकशाहीची क्रूर थट्टा असून देवेंद्र फडणवीस हे गप्प बसले आहेत असे सपकाळ म्हणाले.
कोकाटेंचा पत्ता कट होण्याचे संकेत, मंत्रिपदासाठी धनुभाऊंची दिल्लीत फिल्डिंग, शाहंची घेतली भेट
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला आहे. ते जे बोलले नाहीत त्याचा अपप्रचार केला जात आहे. ऑपरेशन सिंदूरचा काँग्रेस पक्षाला सार्थ अभिमान आहे व त्यावेळी काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. पृथ्वीराज चव्हाण जे बोलले तेच याआधी आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमातून आले आहे व राफेल कंपनीनेही तेच सांगितले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
