Download App

मिलिंद देवरांनी केलेली जखम राहुल गांधी कधीच विसरू शकणार नाहीत…

  • Written By: Last Updated:

मित्र म्हणवणाऱ्या सहकाऱ्यानं असा दगा देऊ नये. असं म्हणण्याची वेळ मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर आणली आहे. राहुल गांधी यांची १४ जानेवारीपासून भारतो जोडो न्याय यात्रा सुरू करण्याच्या दिवशीच काॅंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या शुभारंभातच माशी शिंकण्यासारखेच हे झाले. (Milind Deora joins Shivsena)

देवरा कुटंब आणि गांधी कुटुंब यांचे नजिकचे संबंध होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईत मिलिंद यांचे वडिल मुरली देवरा यांनी काॅंग्रेसची अनेक वर्षे धुरा सांभाळली होती. मुंबईतील अनेक बड्या उद्योगपतींशी त्यांचे संबंध होते. काॅंग्रेसची तिजोरी मुंबईतून भरण्याची मोठी जबाबदारी देवरा यांनी सलगपणे सांभाळली. पुढे ते केंद्रिय पेट्रोलियम मंत्री झाले. देवरा आणि धीरूबाई अंबानी यांचेही सलोख्याचे संबंध होते. अंबानींच्या रिलायन्स समूहातील वाटचालीत देवरा यांच्यासारख्या नेत्यांची पडद्याआडून मदत झाल्याची नेहमीच चर्चा झाली. मुरली देवरा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही सलोख्याचे संबंध होते. बाळासाहेब यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी देवरा यांनीच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.

वडिलांचा हाच वारसा घेऊन मिलिंद हे राजकारणात उतरले होते. मुंबईतील बहुतांश उच्चंभ्रूंची वसाहत असलेल्या दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा हे वयाच्या २७ व्या वर्षी खासदार झाले. काॅंग्रेसमध्ये २००९ च्या सुमारास राहुल गांधीही सक्रिय झाले होते. त्यांच्या उभरत्या काळात सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद असे तरुण नेते हे त्यांच्या नजिक आले. मिलिंद यांच्या खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये राहुल यांनी त्यांना मंत्रीही केले. इतर तरुण नेत्यांनाही राहुल यांनी मंत्रीपदावर संधी दिली होती. पण दुर्देवाचा भाग असा की पायलट वगळता यातील सर्व नेते त्यांना सोडून गेले.

गिटार वादक, फुटबाॅपटू म्हणून मिलिंद यांची ओळख आहे.  अॅडलॅबचे मनमोहन शेट्टी यांच्या कन्या पूजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे मुंबईतील हाय प्रोफाईल कपल म्हणूनही त्यांचा डंका आहे. वडिलांप्रमाणे अनेक उद्योगपतींशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदींचे वारे होते. अशा वेळी मुकेश अंबानी आणि उदय कोटक या दोन्ही उद्योगपतींनी देवरा यांना निवडून द्यावे म्हणून खुले आवाहन केले होते. इतका अंबांनी यांचा मिलिंद यांच्याशी जिव्हाळा होता. देशभरात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसची दाणादाण उडाली. त्यात देवरा यांचाही पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राहुल यांचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद यांनीही लगेच आपला मुंबई शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

देवरा आणि मुंबईतील इतर काॅंग्रेस नेत्यांशी फारसे कधी पटले नाही. परंतु राहुल यांचा वरदहस्त असल्याने त्यांची काॅंग्रेसमध्ये चढती कमान राहिली. पक्षाची अधोगती सुरू झाल्यानंतर त्यांचाही बहराचा काळ संपला. खरे तर २०१९ मध्येच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु त्या लोकसभ निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती झाल्याने देवरा यांना भाजप प्रवेश करून फायदा नसल्याचे लक्षात आले होते. गेली पाच वर्षे तसे ते थेट सक्रिय नव्हते. संजय निरूपम, भाई जगताप या काॅंग्रेस नेत्यांशी त्यांचे फारसे पटलेच नव्हते. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या निर्णयाने एकदम चर्चेत आले. पण त्यांच्यावर कठोर टीका करण्याचे काॅंग्रेस नेत्यांनी टाळले.

 

मिलिंद देवरा यांना २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा उमेदवार म्हणून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना पुन्हा खासदार व्हायच होते. पण काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांची महाविकास आघाडी जन्माला आली. दक्षिण मुंबई या मतदारंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीच देवरा यांना दोन्ही वेळा अस्मान दाखवले होते. आता महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला जाण्याची चिन्हे दिसताच देवरा खवळले. ज्या सावंत यांनी आपला पराभव केला त्यांचा प्रचार करण्यास त्यांचा नकार स्वाभाविक होता. मग पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. शिंदे यांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवला की अधिकृत शिवसेना प्रवेश होण्याआधीच देवरा यांची डावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात समावेश झाला होता.

एकूणात राहुल यांच्या यात्रेला पहिलाच झटका देण्याचे काम भाजप आणि शिवसेनेने केले आहे. राहुल यांच्या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. राहुल मुंबईत येण्याच्या आधीच देवरांच्या रुपाने मुंबईतून पहिला झटका काॅंग्रेसला मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या पहिल्या यात्रेच्या वेळीच काॅंग्रेसमध्ये स्फोट घडविण्याचा भाजपचा इरादा असल्याची चर्चा होती. आता दुसऱ्या यात्रेच्या निमित्ताने आणखी किती काॅंग्रेस नेते भाजप गळाला लावणार याची उत्सुकता आहे. मिलिंद देवरा यांनी ज्या पद्धतीने जखम केली आहे, ती राहुल कधीच विसरणार नाहीत. ते यामुळेच.

 

 

 

follow us