मुंबई : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दावोस दौऱ्यावरून राज्यात परतले. शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली तर अस्वस्थ होऊ नये. डोक्यामध्ये एवढा राग घेऊ नका. थोडे शांत व्हा, संयम राखा. वाटेल ते बोलण्याचे काही कारण नाही. आदित्य ठाकरेंनी आता तरी प्रगल्भ व्हावे. असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) टोला लगावला. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या २८ तासांच्या दावोस दौऱ्यामध्ये तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले आहे, याचा तपशील जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत टोला लगावला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, भारतात अनेक मुख्यमंत्री चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. मात्र एकनाथ शिंदे कमर्शियल विमानाने गेले होते. राज्यामध्ये पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे येताना मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटमध्ये मुंबईत आले. प्रत्येक सरकारी खर्चाची नोंद ठेवली जात आहे. ऑडिट केले जात आहे. महाराष्ट्रात तर अतिशय स्ट्रिक्ट ऑडिट होत आहे. सर्व खर्चाचीही नोंद ठेवली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या आरोपात काही देखील तथ्य नाही. अशी टीका केसरकर यांनी यावेळी केली आहे.
ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असे बोलत असतात, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, परदेशी गुंतवणूकदारांना राज्यातील प्रमुखांबरोबर करार करायचे असतात. आणि ते दावोसलाच होतात. एवढा साधा कॉमन सेन्स नसेल, तर मी काय बोलणार ? मी आता त्यांच्यावर टीका करणार नाही. मुंबईत असताना परदेशी शिष्टमंडळाला भेटत नाही, असे मुख्यमंत्री होते आणि एक जे ७६ तासांतील ७२ तास काम करत आहेत, असे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले आहेत, त्या कंपन्या महाराष्ट्रामधील आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. याला प्रतिउत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले की, त्यांनी दावोसला जाऊन करार केले, तेव्हा फक्त त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का ? असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला. दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी गुंतवणूक आणली. मतांचे राजकारण करायचे की, लोकांच्या हित करायचे, हे ज्या त्या राज्याने ठरवावे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी ७२ तास काम केले. माहिती घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी एक प्रवक्ता नेमावा अशी खोचक टीका केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
आमदार संतोष बांगर प्रकरणावर दीपक केसरकर म्हणाले की, हे प्रकरण घडलेले असेल तर गृहविभाग त्याच्यवर कारवाई करेलच. आम्हाला आमदार आणि सर्वसामान्य सर्वजण सारखेच आहेत. बांगर यांच्याशी चर्चा करू. त्यांनी संयम बाळगला पाहिजे. सरकारची इमेज त्यांच्यावर अवलंबून आहे. बांगर हे अग्रेसिव्ह आहेत, मात्र ते कारणासाठी भांडतात. आपल्याला इतर कामे असताना या खोट्या आरोपांना उत्तर द्यावे लागत असल्याची खंत केसरकरांनी व्यक्त केली.