ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी डिवचलं आहे. संजय राऊत हेच स्वत:ला धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले
विखे म्हणाले, शरद पवार यांना जर धमकी आली असेल तर नक्कीच त्याची चौकशी केली जाईल पण संजय राऊतांना धमकी येण्याचं काही कारणच नाही, संजय राऊत स्वत:लाच धमकी देत असतील, असं विखे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना धमकी देतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित व्यक्ती राऊतांना धमकी देताना दिसत आहे.
तर शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली. हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट केल्याप्रकरणी अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे सौरभने आपण भाजप कार्यकर्ते असल्याचा उल्लेख ट्विटरवरील बायोमध्ये केल्याची माहिती समोर आलीय.
मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
धमकी प्रकरणी शरद पवार आणि संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं असून मला आलेल्या धमकीबद्दल चिंता नसल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तर आमच्या जीवाचं बर वाईट व्हावं हेच सरकारला हवं असल्याची टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, शरद पवारांच्या धमकी प्रकरणी नक्कीच चौकशी केली जाईल पण संजय राऊतांच्या धमकी प्रकरणाची राधाकृष्ण विखे यांनी खिल्ली उडवली असल्याचं दिसून आलं आहे. एकंदरीत धमकी प्रकरणावरुन विखे यांनी राऊतांना डिवचलं आहे. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.