Amol Mitkari on Chhagan Bhujbal : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रविवारी पार पडला. नागपुरात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. जहॉं नही चैना, वहॉं नही रहना, अशा शब्दात भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवली. त्यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सूचक वक्तव्य केलं.
अमोल मिटकरींनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भुजबळांच्या नाराजीविषयी विचारले असता ते म्हणाले की, भुजबळ नाराज नाहीत. चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील, जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना, तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, तेरे बिना दिल नहीं लगता. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो. भुजबळंना मंत्रीपद मिळालं नाही, याचा अर्थ असा की, अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजितदादा कुणावर अन्याय करत नाहीत, असं मिटकरी म्हणाले.
‘जय श्री राम’ची घोषणा देणे…गुन्हा कसा? सुप्रीम कोर्टाचा सवाल
भुजबळ काय म्हणाले होते?
छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला मंत्रिमंडळातून का काढून टाकण्यात आले हे मला माहीत नाही. पण, सात-आठ दिवसांपूर्वी माझं माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्हाला राज्यसभेवर जायचे असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असे ते म्हणाले. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचे होतं तेव्हा तुम्ही मला संधी दिली नाही. तुम्ही लढाईत असाल तर पक्ष ताकदीने पुढे जाईल, असे सांगितलं गेलं. माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे. लगेच राज्यसभेवर जाऊ शकत नाही. हा माझ्या मतदारांचा विश्वासघात ठेरल. ज्यांनी माझ्यावर प्रेम केले त्यांचा विश्वासघात मी करणार नाही, असे ते म्हणाले. तर पक्षाने डावलल्यानंतर तुमची पुढील भूमिका काय असेल? असे विचारले असता भुजबळ यांनी आता बघू… जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना, असं सूचक वक्तव्य केलं.
ओबीसी समाज नाराज…
भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागे नेमकी काय कारणे होती? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे. त्याचबरोबर अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणाऱ्या अजित पवारांनी अडीच वर्षांसाठी भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? हे पुढं येऊन सांगावं, असं हाके म्हणाले.