जळगाव: राज्यातमध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटाचे आमदार सतत वादात सापडत आहेत. वादग्रस्त वक्तव्यं आणि भाषेमुळे शिंदे गटाचे नेते कायम अडचणीत येताना दिसत आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांना सूचना देखील दिल्या होत्या. मात्र यापासून शिंदे गटातील नेत्यांनी काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही. कारण, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक नवा वाद स्वतः वर ओढावून घेतला आहे. उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा फोन करणाऱ्यास बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची एक क्लीप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संजय गायकवाड यांनी ही क्लीप माझीच असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनिल गंगतिरे या शेतकऱ्याने संजय गायकवाड यांना फोन केला होता. यावेळी त्याने गायकवाड यांना बोदवड परिसर उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला होता. यावर संजय गायकवाड वैतागले. आणि बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्याकरिता मी केंद्र आणि राज्य सरकारकडून ११०० कोटींचा निधी देखील मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मार्च महिन्यात योजनेचे काम सुरु होईल.
यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका, असे गायकवाड यांनी गंगतिरे यांना सुनावले. यावर संबंधित नागरिकही आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागला होता. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा खूपच चढला आणि त्यांनी या नागरिकाला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आमदार व संबंधित नागरिकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
बोदवड परिसर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी बोदवड तालुक्यातील शेतकरी बोदवड ते मंत्रालय ४७४ किलोमीटर पायी गेल्यानंतर आझाद मैदानावरून (मुंबई) भोले महाकाल फाउंडेशन अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना फोन लावल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना चक्क शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला आणि ही नौटंकी की बंद करा असे सांगितले. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लीप माझीच असल्याचे संजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे. ती व्यक्ती शेतकरी होती की नाही हे सांगता येत नाही. पण जी भाषा तो बोलत होता, त्याला उत्तर दिलं आहे. मोताळा तालुक्यातील बोदवड येथील उपसा सिंचन काम अंतिम टप्प्यात असून तो आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्याविषयी लवकरच बैठक लावून ते पूर्णत्वास जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तब्बल अर्धा तास बोलल्यावर फक्त 2 मिनिटांची क्लिप का दाखवली जात आहे, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने त्याचे क्रेडिट आमच्या सरकारला मिळू नये, म्हणून शेतकऱ्याला पुढे करून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप संजय गायकवाड यांनी यावेळी केला आहे.