Download App

जयंत पाटलांचा आक्रमक पवित्रा कायम

  • Written By: Last Updated:

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले.

दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची घोषणा करून शिवसेनेवर मात करण्याची संधी सत्ताधारी पक्षाने साधली. या साऱ्या विषयावरून गदारोळ सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर भिडले होते.

अशी चौकशी करणे कसे चुकीचे आहे हा मुद्दा विरोधक नेते सांगत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे आक्रमकपणे आदित्य ठाकरे यांची बाजू मांडत होते. याचवेळी अजित पवार यांच्या शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्या तोंडातून एक शब्द गेला आणि सत्ताधारी पक्षाला दुसरी एक संधी आयती मिळाली.

जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याची संधी शिंदे गटाने सोडली नाही. जयंत पाटील यांचे निलंबन करावे, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आग्रह धरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचे संबंध चांगले असतानाही शिंदे गट निलंबनासाठी आग्रही होता. त्यामुळे शिंदे गटाची मागणी भाजपला मान्य करावी लागली.

एखाद्या ज्येष्ठ नेत्याला सभागृहातून निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ असावी. जयंत पाटील हे 1990 पासून सलग विधानसभेत निवडून येत आहेत. सभागृहात अभ्यासू पद्धतीने बोलण्याची आणि नर्म विनोदी शैलीत टोले लगावण्याची त्यांची शैली आहे. तरीही त्यांच्या तोंडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात एक शब्द गेल्याने त्यांना आज निलंबित व्हावे लागले.

राहुल नार्वेकर हे विरोधी नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांचे अनेक निर्णय विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पसंत पडलेले नाहीत. त्यातूनच जयंत पाटील यांच्या तोंडी चुकीचा शब्द गेल्याचे बोलले जात आहे. निलंबनाचा निर्णय झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे सरकार विरोधात लढत राहणार असा इशारा दिला. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणत त्यांनी दोन ओळींचे ट्विट केले आहे.

Tags

follow us