स्थानिक गुन्हे शाखेची अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई; तब्बल 132 किलो गांजासह दोघांना अटक
झडतीत एकूण 132.84 किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ वाहन असा 25 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Major operation in Ahilyanagar; Two arrested with 132 kg of ganja : अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 132 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 25 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एमएच-14 जीएच-2330 क्रमांकाची स्कॉर्पिओ कारमधून दोन जण गांजाची वाहतूक करत कर्जतहून पाथर्डीकडे जाणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी मिरजगाव–कर्जत मार्गावरील महात्मा फुले चौक परिसरात सापळा रचला. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी कार अडवून झडती घेतली. कारच्या डिकीत चार गोण्या आढळून आल्या. चौकशीदरम्यान त्या गोण्यांमध्ये गांजा असल्याची कबुली आरोपींनी दिली. झडतीत एकूण 132.84 किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ वाहन असा 25 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरमहा 15% परताव्याचे आमिष आणि कोट्यवधींचा घोटाळा; सिस्पे इन्फिनिटी प्रकरणात 12 आरोपी तुरुंगात
या प्रकरणी गणेश अंकुश कराड (वय 32) आणि सुखदेव शिवनाथ कदम (वय 30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास मिरजगाव पोलीस करत आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
